स्वयंपाकाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने स्वयंपाकाचे आचार, स्वयंपाकातील घटक, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती इत्यादींच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांतून हिंदु धर्माने स्वयंपाकाच्या आचारांच्या संदर्भात घालून दिलेले नियम, तसेच सांगितलेली सूत्रे किती योग्य आहेत, तसेच आताच्या आधुनिक काळातही ती किती तंतोतंत लागू पडतात, हे लक्षात येते. असेच एक संशोधन पुढे दिले आहे.
सर्वसाधारण गृहिणी स्वयंपाक बनवतांना पोळी, भाजी, आमटी, भात, चटणी, कोशिंबीर हे पदार्थ प्रतिदिन बनवते. स्वयंपाकात वापरलेले अन्नघटक, स्वयंपाक बनवण्याची पद्धत, स्वयंपाक बनवण्याचे ठिकाण, स्वयंपाक बनवणारी व्यक्ती इत्यादी घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा स्वयंपाक सात्त्विक बनतो आणि तो ग्रहण करणार्याला सात्त्विकतेचा लाभ होतो.
‘स्वयंपाक बनवणारी व्यक्ती साधना करणारी असणे आणि स्वयंपाक बनवण्याचे ठिकाण सात्त्विक असणे, यांचा स्वयंपाकातील पदार्थावर, तसेच तो ग्रहण करणार्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, स्थुलातून आध्यात्मिक त्रास जाणवत नसलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली ६३ टक्के पातळीची साधिका सहभागी झाल्या होत्या. या चाचणीत पुढीलप्रमाणे ४ प्रयोग करण्यात आले.
१ ला प्रयोग : चाचणीतील साधिकांनी सर्वसाधारण गृहिणीने (साधना न करणार्या गृहिणीने) घरी बनवलेली पोळी ग्रहण करणे
२ रा प्रयोग : चाचणीतील साधिकांनी साधक-गृहिणीने घरी बनवलेली पोळी ग्रहण करणे
३ रा प्रयोग : चाचणीतील साधिकांनी सनातनच्या आश्रमात साधिकेने बनवलेली पोळी ग्रहण करणे
चाचणीतील तिन्ही प्रयोगांमध्ये सर्वसाधारण गृहिणीने आणि साधिकांनी हाताने पोळ्या बनवल्या आहेत.
४ था प्रयोग : चाचणीतील साधिकांनी सनातनच्या आश्रमात यंत्रावर बनवलेली पोळी ग्रहण करणे (सनातनच्या आश्रमात साधक संख्या पुष्कळ असल्याने पोळी बनवण्यासाठी यंत्राचा उपयोग करण्यात येतो. सात्त्विक ठिकाणी (आश्रमात) यंत्रावर बनवलेली पोळी ग्रहण केल्याने व्यक्तीवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला.)
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
सर्वसाधारण गृहिणीने घरी बनवलेली पोळी, साधक-गृहिणीने घरी बनवलेली पोळी, सनातनच्या आश्रमात साधिकेने बनवलेली पोळी आणि सनातनच्या आश्रमात यंत्रावर बनवलेली पोळी यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. चाचणीतील तिन्ही साधिकांची त्यांनी प्रत्येक प्रयोगात पोळी ग्रहण करण्यापूर्वी आणि ग्रहण केल्यानंतर २० मिनिटांनी ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.
१ अ. सर्वसाधारण गृहिणीपेक्षा साधक-गृहिणीने घरी बनवलेल्या पोळीमध्ये आणि त्याहीपेक्षा सनातनच्या आश्रमात बनवलेल्या पोळ्यांमध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
१ आ. चाचणीतील साधिकांनी प्रयोगांत पोळी ग्रहण केल्याने त्यांच्यावर झालेले परिणाम
चाचणीतील साधिकांनी प्रयोगांत पोळी ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा किती टक्के अल्प झाली आणि सकारात्मक ऊर्जा किती टक्के वाढली, ते पुढे दिले आहे.
वरील सारणीतून लक्षात येते की, चाचणीतील तिन्ही साधिकांवर आश्रमातील यंत्रावर बनवलेल्या पोळीचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला.
२. निष्कर्ष
अ. सर्वसाधारण गृहिणीने घरी बनवलेल्या पोळीपेक्षा साधक-गृहिणीने घरी बनवलेली पोळी अधिक सात्त्विक आहे. यातून ‘पदार्थ बनवणारी व्यक्ती साधना करणारी असेल, तर तिच्यातील सात्त्विकतेचा सकारात्मक परिणाम तिने बनवलेल्या पदार्थावर होतो’, हे लक्षात येते.
आ. अन्य ठिकाणांच्या तुलनेत संतांचे आश्रम पुष्कळ सात्त्विक आहेत. सनातनच्या आश्रमात साधिकेने बनवलेली पोळी आणि यंत्रावर बनवलेली पोळी यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता आढळून आली. सनातनच्या आश्रमात यंत्रावर बनवलेली पोळी ग्रहण केल्याने चाचणीतील साधिकांवर सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाले. यातून ‘स्वयंपाक बनवणारी व्यक्ती साधना करणारी असणे आणि स्वयंपाक बनवण्याचे ठिकाणही सात्त्विक असणे, यांचा त्या पदार्थावर अन् तो पदार्थ ग्रहण करणार्यावर पुष्कळ प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो’, हे लक्षात येते.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. सर्वसाधारण गृहिणीपेक्षा साधक-गृहिणीने बनवलेल्या पोळीमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण : प्रयोगातील साधक-गृहिणी अनेक वर्षांपासून साधना करत आहे. ती घरातील प्रत्येक कृती साधना म्हणून करते, उदा. स्वयंपाकाला आरंभ करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करणे, नामजप करत स्वयंपाक करणे, स्वयंपाक करून झाल्यावर देवाला कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी. तसेच ती स्वयंपाकघरातील वातावरण प्रसन्न आणि सात्त्विक रहावे, यासाठी स्वयंपाकघराची नियमित स्वच्छता अन् शुद्धी करते.
याचा सकारात्मक परिणाम तिने बनवलेल्या स्वयंपाकावर होतो. कुटुंबातील सर्वांनी तो स्वयंपाक ग्रहण केल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात. याचाच प्रत्यय चाचणीतून आला. सर्वसाधारण गृहिणीपेक्षा साधक-गृहिणीने बनवलेल्या पोळीमध्ये अधिक सात्त्विकता आढळून आली, तसेच तिने बनवलेल्या पोळ्या ग्रहण केल्याने चाचणीतील साधिकांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
३ आ. सनातनच्या आश्रमात बनवलेल्या पोळ्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) असण्याचे कारण : ‘सनातनच्या आश्रमातील चैतन्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे’, असे अध्यात्मातील जाणकार (संत) सांगतात. आश्रमातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम आश्रमात रहाणारे साधक, आश्रमातील वस्तू, आश्रमाची वास्तू, आश्रमाच्या सभोवतालचे वातावरण इत्यादींवर होतो. आश्रमातील स्वयंपाकघरात संतांच्या स्वरातील चैतन्यमय भजने किंवा देवतांचा नामजप हळू आवाजात लावून ठेवण्यात येतो. स्वयंपाकघरात सेवा करणारे साधक भावपूर्ण प्रार्थना अन् नामजप करत सेवा करतात. आश्रमातील चैतन्य आणि साधकांचा सेवाभाव यांमुळे आश्रमात बनवण्यात येणारे पदार्थ चैतन्याने भारित होतात. सनातनच्या आश्रमात बनवलेल्या पोळीमध्ये चैतन्य असल्याने तिच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. चाचणीतील साधिकांनी या पोळ्या ग्रहण केल्याने त्यांना त्यातील चैतन्याचा लाभ झाला.
३ इ. आश्रमातील साधिकेपेक्षा यंत्रावर बनवलेल्या पोळीचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम होण्याचे कारण : सध्याच्या काळात बर्याच गृहिणी वेळ आणि कष्ट वाचावे, म्हणून स्वयंपाकघरात विजेवर चालणारी विविध प्रकारची यंत्रे वापरतात, उदा. ‘फूड प्रोसेसर’ (भाज्या चिरण्याचे यंत्र), ‘मिक्सर ग्राईंडर’ (चटणी आणि विविध पदार्थ बारीक वाटण्यासाठीचे यंत्र), ‘रोटी मेकर’ (पोळ्या बनवण्याचे यंत्र) इत्यादी. यंत्रांचा वापर करून स्वयंपाक लवकर होतो; पण पदार्थातील सात्त्विकतेवर त्याचा परिणाम होतो. विजेवर चालणार्या यंत्रातून निर्माण होणार्या नादाकडे वातावरणातील त्रासदायक स्पंदने आकृष्ट होतात. त्यामुळे तेथील वायूमंडल दूषित होऊन त्याचा परिणाम तो पदार्थ, पदार्थ बनवणारी व्यक्ती आणि तो पदार्थ ग्रहण करणारी व्यक्ती या सर्वांवर होऊन तेही त्रासदायक स्पंदनांनी भारित होतात. (याचे संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.) असे असूनही सनातनच्या आश्रमात यंत्रावर बनवलेल्या पोळीमध्ये मात्र एवढी सात्त्विकता आढळून येणे, तसेच ती पोळी ग्रहण केल्याने चाचणीतील साधिकांवर सर्वाधिक परिणाम होणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामागील कारणे पुढे दिली आहेत.
१. आधुनिक यंत्राचा उपयोग करण्यामागील उद्देश सात्त्विक असणे : ‘आश्रमातील साधिकांचा हाताने पोळ्या बनवण्यासाठीचा वेळ वाचून तो त्यांच्या व्यष्टी साधनेसाठी, तसेच अन्य समष्टी सेवांसाठी वापरता यावा’, या उद्देशाने आश्रमात कणिक भिजवायचे यंत्र, भाजी चिरण्याचे यंत्र, पोळी बनवण्याचे यंत्र इत्यादी यंत्राचा वापर करण्यात येतो.
२. यंत्रावर पोळी बनवण्याची सेवा करणार्या साधिका नामजप करत भावपूर्णरीत्या सर्व कृती करतात.
३. आश्रमातील स्वयंपाकघरात संतांच्या आवाजातील भजने किंवा देवतांचे नामजप हळू आवाजात लावून ठेवण्यात येतात. यामुळे तेथील वातावरणातील सात्त्विकता टिकून रहाते. या सात्त्विकतेचा सकारात्मक परिणाम आश्रमात बनवलेल्या पदार्थांवर होऊन तेही चैतन्याने भारित होतात.
४. आश्रमातील यंत्रावर बनवलेल्या पोळ्यांमध्ये उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने असणे : घरी हाताने बनवलेल्या पोळ्यांवर व्यक्तीतील स्पंदनांचा परिणाम होत असल्याने त्या पोळ्यांमध्ये सगुण स्तरावरील सकारामक स्पंदने आहेत. आश्रमातील यंत्रावर बनवलेल्या पोळ्यांवर मात्र आश्रमातील चैतन्यमय वातावरणाचा परिणाम प्रामुख्याने झाल्याने त्या पोळ्यांमध्ये (सगुण-निर्गुण) उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने आहेत. यामुळे चाचणीतील साधिकांवर यंत्रावर बनवलेल्या पोळ्या ग्रहण केल्याने सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.९.२०२१)
ई-मेल : [email protected]
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |