ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची सरकारवर टीका
सातारा, २८ जानेवारी (वार्ता.) – सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुपर मार्केटमध्ये मद्यविक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे, असा समाजघातकी निर्णय घेणारे सरकार लवकर रसातळाला जावो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, अशी तीव्र उद्वीग्नता ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.
सरकारवर उपरोधिकपणे टीका करतांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले, ‘‘सरकारने अजून एक उपकार करावेत ते म्हणजे कोणतीही अट न घालता किराणा दुकानातही मद्य उपलब्ध करून द्यावे, तसेच भाजी मंडईमध्येही मद्य उपलब्ध करून द्यावे. सकाळी दूध आणि पेपर वाटप करणार्यांनाही मद्य विक्रीची अनुमती द्यावी. शालेय शिक्षण पोषण आहारातही मद्याचा समावेश करण्यात यावा. देशाची भावी पिढी अत्यंत सक्षम होण्यासाठी सरकारचा हा निर्णय अत्यंत योग्य राहिल. सरकारने मंदिरातही मद्य तिर्थाच्या रूपात उपलब्ध करून द्यावे; म्हणजे भाविकांचेही कल्याण होईल. माझे महाराष्ट्रातील समस्त सूज्ञ नागरिकांना आवाहन आहे की, सरकारच्या या धाडसी आणि ऐतिहासिक निर्णयाचे उत्साहात स्वागत करावे.’’