सहकारी साखर कारखान्यांच्या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अण्णा हजारे यांच्याकडून सत्याग्रह आंदोलनाची चेतावणी

अण्णा हजारे

नगर – महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांचे लोक आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकर्‍यांनी त्यांचे भागभांडवल अन् भूमी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेऊन अनुमाने २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरण वाढीला लावले. याविषयी चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. या पत्राची प्रतिलिपी (सीसी कॉपी) अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवली आहे. याविषयी अण्णांनी २४ जानेवारी या दिवशी राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलतांना सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळ्यावर भाष्यही केले.

‘साखर कारखाने बंद पडले नाहीत, तर बंद पाडले गेले’, असा आरोप करत या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा मी माझ्या मार्गाने मी जाईन’, असे सांगत अण्णांनी सत्याग्रह आंदोलनाची चेतावणी दिली आहे.