साधकत्व आणि गुरुसेवेची तळमळ असलेली, ५१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील बालसाधिका कु. स्नेहल (मनस्वी) सुजित पाटील (वय ११ वर्षे) !
कु. स्नेहल सुजित पाटील हिच्याविषयी तिचे कुटुंबीय आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
१ अ. गरोदरपणी : ‘बाळाच्या जन्मापूर्वी मी शिवाचा नामजप आणि उपवास करणे, अशा प्रकारे शिवाची उपासना करत होते. या कालावधीत मला कोणताही त्रास झाला नाही. मी सतत आनंदी होते.’ – सौ. सुषमा पाटील (कु. स्नेहलची आई), संभाजीनगर
१ आ. बाळाच्या जन्मानंतर
१ आ १. वय २ ते ४ वर्षे
१ आ १ अ. व्यवस्थितपणा : ‘कु. स्नेहलमध्ये पहिल्यापासूनच व्यवस्थितपणा आहे. ती तिच्या सर्व वस्तू शाळेच्या बॅगेत नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवायची. ती पेन्सिल आणि खोडरबर काटकसरीने वापरायची. तिने घरातील कोणत्याच वस्तूची कधीच मोडतोड केली नाही. तिला कळत असल्यापासून ते आठ वर्षांपर्यंत तिची सर्व खेळणी जशीच्या तशी चांगल्या स्थितीमध्ये होती.
१ आ १ आ. स्वीकारण्याची वृत्ती : आम्हाला काही वेळा रात्रीचा प्रवास करावा लागला. तेव्हा ती सदैव तत्पर आणि उत्साही असायची. तिच्यामध्ये जन्मापासूनच परिस्थिती स्वीकारण्याचा भाग आहे.
१ इ. वय ४ ते ११ वर्षे
१ इ १. समजूतदारपणा : तिच्यापेक्षा लहान असलेला तिचा भाऊ कृष्णा हा पुष्कळ हट्ट करतो; परंतु ती त्याला पुष्कळ समजून घेते. ‘तो लहान आहे. तेव्हा आपण त्याला समजून घेतले पाहिजे’, असे ती आम्हाला नेहमी सांगते. तो रडू लागला, तर ती त्याला जवळ घेऊन आईप्रमाणे त्याच्यावर माया करते.
१ इ २. प्रेमभाव : एखाद्याचा वाढदिवस असेल, तर ती स्वतः त्यांना भ्रमणभाष करते आणि त्यांना काव्याच्या (गाण्याच्या) स्वरूपामध्ये शुभेच्छा देते.
१ इ ३. स्वच्छतेची आवड : लहान भावाने घर अस्वच्छ केले असेल, तरी ती स्वतः ते स्वच्छ करते. हे ती दिवसातून अनेक वेळा करते. ती वेळप्रसंगी भांडी घासते, तसेच कपडेही धुते.
१ इ ४. स्वावलंबी : ती कुठल्याच गोष्टीत माझ्यावर (आईवर) अवलंबून रहात नाही. ती स्वतःचे अंथरूण स्वतः घालते. त्या वेळी ‘मी हे अंथरूण गुरुदेवांसाठी घालत आहे’, असा तिचा भाव असतो.
१ इ ५. कार्यतत्परता : तिला घरात कोणतेही काम करावे लागले, तरी तिच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त होत नाही. ती लगेच ते नम्रपणाने स्वीकारते आणि कृती करते.
१ इ ६. परिस्थितीचा स्वीकार करणे : ती प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर रहाते. ती प्रत्येक वेळी परिस्थितीचा स्वीकार करते. तिने लहानपणापासून कधीच हट्ट केला नाही.
१ इ ७. गुरुसेवेची तळमळ
अ. रविवारचा शाळेचा सुट्टीचा दिवस असतो; परंतु ‘आपल्याला आठवड्यातील एकच सुट्टीचा दिवस खेळण्यासाठी मिळतो’, असा विचार न करता तिच्याकडून सेवेला प्राधान्य दिले जाते आणि कुठेही सेवा असेल, तरी ती उत्साहाने सेवेसाठी तत्पर असते.
आ. कधीकधी उन्हामध्ये सेवा करावी लागते. तेव्हा कोणतेही कारण न सांगता ती ग्रंथ वितरण इत्यादी करते. सेवेत असतांना रात्री कितीही उशीर झाला, तरी ती कोणतेही गार्हाणे करत नाही. उशीर झाल्यामुळे खरेतर तिला भूक लागलेली असते; परंतु ती तिला भूक लागल्याचे कधीच जाणवू देत नाही.
१ इ ८. सेवेतील सतर्कता : ती ग्रंथसेवा करतांना अनेक साधक तिथे असतात; परंतु ती नेहमी प्रत्येक ग्रंथाचे मूल्य पाहून आणि निश्चिती करून नंतरच त्याविषयी जिज्ञासूंना सांगते.
१ इ ९. सेवा परिपूर्ण करणे : ती ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत असतांना प्रत्येक उत्पादनाची मांडणी योग्य पद्धतीने करते. ‘येणार्या ग्राहकांना प्रदर्शन आकर्षक दिसावे’, असा तिचा भाव असतो.
१ इ १०. मनमिळाऊपणा : काही वेळा सेवा करतांना ती साधकांना पहिल्यांदाच भेटलेली असते. तेव्हा ती अनोळखी साधकांशीही मनमोकळेपणाने बोलते आणि सर्वांमध्ये मिसळून जाते. ती स्वतःहून साधकांची ओळख करून घेते आणि त्यांच्याशी बोलते. सेवेमध्ये साधकांना एखादी गोष्ट हवी असेल, तर ती तत्परतेने त्यांना आणून देते आणि आपलेपणा दाखवते.
१ इ ११. शिकण्याची वृत्ती असणे : कोणतेही कौशल्य, कला, तसेच एखादे सूत्र ती मनापासून ऐकते आणि शिकण्याची वृत्ती ठेवून तत्परतेने कृती करते. ती इतरांनासुद्धा ती सेवा करण्यासाठी उद्युक्त करते.
१ इ १२. इतरांचा विचार करणे : एखादी अडचण असेल किंवा एखाद्या साधकाला एखाद्या सूत्रासाठी सारखा भ्रमणभाष करावा लागत असेल, तेव्हा ‘त्या साधकांना त्रास तर होणार नाही ना !’, असा तिचा विचार असतो. ती म्हणते, ‘आपण एक सेवा करतो, तर आपल्याला एवढा ताण येतो. इतर साधक अनेक सेवा करत असतात. त्यांना कशाला त्रास द्यायचा ? आपणच आपल्या स्तरावर अडचण सोडवूया आणि नंतर संबंधित साधकांना विचारूया.’
– सौ. सुषमा आणि श्री. सुजित पाटील (कु. स्नेहलचे आई-वडील), संभाजीनगर.
२. साधिकांना जाणवलेली सूत्रे
२ अ. कु. चैताली डुबे, संभाजीनगर
२ अ १. विचारण्याची वृत्ती
अ. ‘स्नेहल वयाने लहान असूनही इतरांचा पुष्कळ विचार करते. प्रत्येक वेळी भ्रमणभाषवर बोलतांना ती संबंधित साधकांना ‘तुम्हाला वेळ आहे का ?’, असे विचारून घेते आणि त्यानंतरच बोलते.
आ. ती आधी गोव्याला रहायची. इथे ती जसा व्यष्टी साधनेचा आढावा देते, तसा ती गोव्यातील तिच्या मैत्रिणींचा आढावा घेते. ‘तिच्या मैत्रिणींचेही साधनेचे प्रयत्न वाढावेत आणि त्यांना पुढील मार्गदर्शन मिळावे’, यासाठी त्या मैत्रिणींना येथील आढाव्याला जोडू शकतो का ?’, असे तिने विचारले. यातून तिची विचारण्याची वृत्ती आणि साधनेची तळमळ शिकायला मिळाली.
इ. आरंभी ती ‘ट्विटर’वर सेवा करायची, तेव्हा ती प्रत्येक वेळी बाबांकडून तिला हव्या असलेल्या ‘ट्विट’ सिद्ध करून घ्यायची. त्यानंतर ती त्या मला तपासण्यासाठी पाठवायची आणि अंतिम झाल्यावरच ‘ट्विट’ करायची.
२ अ २. भावपूर्ण सेवा करून इतरांनाही सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करणे : एकदा बालसाधकांना काही सेवा दिल्या होत्या. कु. स्नेहलला ‘सोशल मिडिया’ची सेवा दिली होती. कधी ‘ट्विटर ट्रेंड’ असेल, तर ती सर्वांना आठवण करून देते. बालसाधकांनी तळमळीने आणि गांभिर्याने सेवा करावी, यासाठीही ती ‘ऑडिओ’ संदेश पाठवून त्यांना प्रोत्साहन देते. तिचे हे ‘ऑडिओ’ संदेश ऐकून पुष्कळ कृतज्ञता वाटते. त्यातून तिची गुरुसेवेची तीव्र तळमळ शिकायला मिळते. तिच्याकडे पाहून ‘मी अजून किती तळमळ वाढवायला हवी ?’, याची मला जाणीव होते.
मी एकदा तिच्या बाबांना हिंदु धर्मजागृती सभेतील अभिप्राय देण्याची सेवा दिली होती; पण मला त्या सेवेचा नियमित आढावा स्नेहल देत असे.
२ अ ३. ती बालसाधकांच्या आढाव्यामध्ये पुष्कळ भावपूर्ण प्रार्थना घेते, तसेच तिची भावप्रयोग सांगण्याचीही सिद्धता असते.’
२ आ. कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर
२ आ १. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान : ‘कु. स्नेहल लहान असूनही तिच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी पुष्कळ अभिमान आहे. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या होत असलेल्या हानीविषयी तिच्या मनामध्ये चीड आहे आणि ती रोखण्यासाठी मी काय प्रयत्न करू शकते ?’, यासाठी तिची धडपड असते.
२ आ २. गुरुकार्याची तळमळ
अ. ती लहान असूनही तिने ‘ट्विटर’ सेवा शिकून घेतली आहे. दळणवळण बंदीच्या काळात झालेल्या सर्व ‘ट्रेंड’मध्ये तिने स्वतः ट्विट करून पुष्कळ चांगली सेवा केली.
आ. लहान असूनही तिच्यामध्ये गुरुकार्याविषयी तळमळ आणि आदर जाणवला. ‘आपल्या चुकीमुळे गुरूंच्या कार्यामध्ये अडथळा यायला नको’, असा तिचा सेवा करतांना विचार असतो.
२ आ ३. प्रांजळपणा : ती लहान असूनही सत्संगात तिने केलेले प्रयत्न सांगतांना आणि शंका विचारतांना तिच्यामध्ये अहंचा वा प्रतिमा जपण्याचा भाग नसतो. ती प्रांजळपणे तिच्या मनातील विचार सांगते आणि शंकाही विचारून घेते.
२ आ ४. सभाधीटपणा : तिच्यामध्ये सभाधीटपणा आणि लढाऊ वृत्ती जाणवते. तिची मनाची सिद्धताही (तयारीही) चांगली असते.
२ आ ५. सेवाभाव : ती आश्रमात आल्यावर किंवा ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी गेल्यावर, तसेच अन्य कुठेही सेवा चालू असेल, तिथे स्वतःहून सेवेत सहभागी होते आणि भाव ठेवून मनापासून सेवा पूर्ण करते.’
३. स्वभावदोष
अ. उतावीळपणा
आ. खेळण्यामध्ये पुष्कळ वेळ वाया घालवणे
इ. भित्रेपणा. तिला कुत्रे आणि जनावरे यांची पुष्कळ भीती वाटते.’
– श्री सुजित पाटील (वडील), सौ. सुषमा पाटील (आई), संभाजीनगर (१८.८.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |