रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या वारसांना आर्थिक साहाय्याचे ३ सहस्र ३८९ अर्ज संमत !

अलिबाग – कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या वारशांना शासनाकडून ५० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी ४ सहस्र ३१६ अर्ज प्रशासनाकडे आले होते. आतापर्यंत ३ सहस्र ३८९ अर्ज संमत करण्यात आले आहेत. त्यांना आर्थिक साहाय्य देण्याचे काम चालू करण्यात आले आहे. तसेच ४८९ अर्ज कागदपत्रांची पूर्तता न केल्याने फेटाळण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे ४ सहस्र ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून एक ‘पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे. यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय आणि सेतू कार्यालय यांच्या माध्यमातून मृतांच्या वारसांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.