पतियाळा (पंजाब) येथील श्री महाकाली मंदिरात मूर्तीचे पावित्र्य भंग करू पहाणार्‍या तरुणाला अटक !

हिंदु संघटनांनी पतियाळ शहर बंद करत काढला मोर्चा !

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या अशा प्रकारच्या अवमानाच्या घटनांमागील षड्यंत्र शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक

ऐतिहासिक श्री महाकालीदेवी मंदिरा

पतियाळा (पंजाब) – येथील ऐतिहासिक श्री महाकालीदेवी मंदिराच्या मूर्तीचे पावित्र्य भंग करू पहाणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. २४ जानेवारीला दुपारी हा तरुण अचानक मूर्तीच्या समोरील अडथळा पार करून चौथर्‍यावर चढला. तेव्हा तेथे उपस्थित पुजार्‍याने त्याला रोखले आणि खाली ढकलले. त्यानंतर अन्य भाविकांनी त्याला पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

उजवीकडे चौथर्‍यावर चढताना तरुण

या घटनेच्या विरोधात हिंदु संघटनांनी २५ जानेवारी या दिवशी शहर बंद ठेवून मोर्चा काढला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गुरुग्रंथ साहिबचा अवमान करणार्‍याला लोकांनी चोपल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

१. पोलिसांनी सांगितले की, राजदीप असे या ३५ वर्षीय तरुणाचे नाव असून तो देवीचा भक्त असून त्याला देवीच्या मूर्तीचे आलिंगन घ्यायचे होते.

२. मंदिरात उपस्थित भाविकांनी पोलिसांना सांगितले की, या तरुणाने मंदिरातील एका महिलेलाही मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता.

३. या घटनेविषयी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, ही घटना निंदनीय आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील हरिमंदिर साहिबमध्येही अवमानाचा प्रयत्न झाला होता. अशा घटना रचणार्‍यांचे षड्यंत्र उघड करणे आवश्यक आहे.

४. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी याविषयी ट्वीट करून म्हटले की, पंजाबमध्ये भय, ध्रुवीकरण आणि घृणा यांच्या राजकारणाची घुसखोरी होत आहे. विघटनकारी शक्ती कधीही पंजाबमधील सामाजिक आणि आर्थिक रचना तोडू शकत नाहीत.