|
|
मुंबई – हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मालवणी येथील एका क्रीडासंकुलाला देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे बांधण्यात आले असून २६ जानेवारी या दिवशी त्यांच्याच हस्ते या क्रीडासंकुलाचे लोकार्पण होणार आहे. भाजपसह स्थानिकांनी टिपू सुलतानाच्या नावाला विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्यात येणार असल्याचे भाजपने घोषित केले आहे.
१. ‘या नामकरणाचा कोणताही ठराव करण्यात आलेला नाही. ही मोगलाई आहे का ? हिंदूंच्या सामूहिक हत्या करणार्यांचे उदात्तीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ?’, असा प्रश्न भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
२. क्रीडासंकुलाला टिपू सुलतान याचे नाव दिल्याने सामाजिक माध्यमांवरून विविध स्तरांतील नागरिकांनी संबंधितांवर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
३. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या एका मुसलमान नगरसेविकेने गोवंडी येथील एका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी केली होती. त्या वेळीही भाजपने विरोध केला होता, तसेच शिवसेनेनेही काम अपूर्ण असल्याने नाव देता येणार नसल्याची भूमिका घेतली होती.
४. क्रूरकर्मा टिपू सुलतानाच्या उघडपणे चालू असलेल्या उदात्तीकरणाविषयी मुंबईकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक हिंदूंना हद्दपार करण्याचा हा डाव ! – आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष, भाजप
मुंबईसह राज्यभरात काही विशिष्ट समाजघटकांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करत आहे. मालाड-मालवणी भागांत मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. हिंदूंसह अन्य कुठल्याही घटकाला हद्दपार करण्याचे सत्ताधार्यांचे मनसुबे आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही.
मालवणी परिसरात हिंदु आणि बौद्ध समाज भीतीच्या सावटाखाली जगत आहे ! – शुभांगी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या, मालवणी
मालवणी-मालाड या भागांत मागील काही कालावधीपासून हिंदू आणि बौद्ध यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. आमची घरे, इमारती, मालमत्ता या ठिकाणी असुरक्षित झाली आहेत. काही घटकांमुळे आमच्या जिवालाही आता धोका निर्माण झाला आहे. या परिसरात हिंदु आणि बौद्ध समाज भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.
आक्रमकाचे नाव देण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान असलेल्यांची नावे द्यावीत ! – दीपक कांबळे, स्थानिक नागरिक
टिपू सुलतान हा एक आक्रमक होता. तो हिंदुविरोधी होता. त्यामुळे अशांची नावे देण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सदैव श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पराक्रमी पहिले बाजीराव पेशवे, चिमाजीअप्पा यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे.