इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांकडून सहावी, सातवी इयत्तांतील विद्यार्थ्यांवर अत्याचार
(रॅगिंग म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक किंवा मानसिक स्तरावर केला जाणारा छळ)
सावंतवाडी – तालुक्यातील एका नामांकित विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावी आणि सातवी या इयत्तांतील विद्यार्थ्यांवर ‘रॅगिंग’सह लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. आतापर्यंत असे प्रकार विशेषत: शहराच्या ठिकाणी घडत असल्याचे ऐकिवात होते; पण आता ग्रामीण भागात आणि तेही लहान वयातील विद्यार्थ्यांकडून हे प्रकार होऊ लागल्याने तो चिंतेचा प्रश्न बनला आहे.
या विद्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. इयत्ता आठवीत शिकणार्या विद्यार्थ्यांनी सहावी आणि सातवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग करणे, लैंगिक शोषण करणे, तसेच त्यांना मारहाण करणे आणि ‘तक्रार केल्यास आणखी छळ करू’, अशी धमकी देणे, असे प्रकार केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संबंधित पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकार्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि अन्य एक कर्मचारी यांच्याविषयी माहिती घेतली. हा प्रकार डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात घडला होता. ‘पीडित विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि गैरवर्तन करणार्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक आणि हाऊस मास्टर यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी पालकांनी पोलिसांकडे केली आहे.
संपादकीय भूमिकालहान वयातील विद्यार्थ्यांकडून असे अश्लाघ्य प्रकार केले जाणे, हे त्यांना शाळांमधून आणि पालकांनी नीतीमत्ता अन् साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! |