पानिपत (जिल्हा हरियाणा) – ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला एकत्रित आणले, त्याचप्रमाणे आज भगवा झेंडा आणि तिरंगा यांच्याखाली एकत्रित येणे ही काळाची आवश्यकता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते १४ जानेवारी या दिवशी पानिपत येथे ‘२६४ व्या शौर्य दिवस समारंभा’त उपस्थित होते. त्यांनी ‘पानिपत शौर्य स्मारका’स भेट दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,..
१. पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे; पण त्याच वेळी पानिपत मराठी माणसाचा अभिमानही आहे. ज्याप्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवले, अतिशय विपरीत परिस्थितीत ते लढले, ही युद्धाच्या इतिहासातील मोठी गोष्ट आहे.
२. या शौर्यानंतर अनेक मराठे सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतरही मराठ्यांनी कधीही माघार घेतली नाही. त्यानंतर १० वर्षांत पुन्हा संपूर्ण भारतावर मराठ्यांनी भगवे राज्य प्रस्थापित केले आणि देहली जिंकून दाखवली.
३. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य संपूर्ण भारतात पसरवण्याचे काम आमच्या मराठ्यांनी केले. पानिपतच्या लढाईत तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला, तरी मराठे कधीच हरले नाहीत. त्यानंतर भारतावर आक्रमण करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही.
४. जोपर्यंत आपण एकत्रित आहोत, तरच सुरक्षित आहोत, हे लक्षात राहील आणि आपली प्रगती होत राहील; पण जातीपातींच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विभाजित झाल्यास कदाचित आम्हाला प्रगती करता येणार नाही.