प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राज्यव्यापी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

  • शाळा, महाविद्यालये, पोलीस आणि प्रशासन यांना विविध ठिकाणी निवेदने दिली

  • सर्वांकडून सहकार्याचे आश्वासन

हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते. पश्चिम महाराष्ट्रात या अभियानांतर्गत घडलेल्या घडामोडी येथे देत आहोत.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

वर्धा – राष्ट्रध्वज राष्ट्राची अस्मिता आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या वेळी हे राष्ट्रध्वज अभिमानाने मिरवण्यात येतात; परंतु त्याच दिवशी कागदी आणि प्लास्टिक यांचे हेच राष्ट्रध्वज रस्ते, कचरा आणि नाले या ठिकाणी फाटलेल्या अवस्थेत पडलेले असतात. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज लगेच नष्ट होत नाहीत. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा हा अवमान अनेक दिवस पहावा लागतो. हे लक्षात घेऊन प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क यांची विक्री करणार्‍यांवर योग्य कारवाई व्हावी आणि अशा मास्कवर बंदी घालावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक श्री. लोखंडे यांनी स्वीकारले. तसेच शिक्षणाधिकारी यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे डॉ. पंडित थोटे, श्री. अनुप चौधरी, श्री. नरेंद्र देशपांडे आणि सौ. भक्ती चौधरी उपस्थित होत्या.

मुलुंड आणि भांडुप, तसेच नवी मुंबई येथे निवेदने

निवेदन स्वीकारतांना मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात (उजवीकडून दुसरे)

मुंबई – २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन साजरा करतांना प्लास्टिक, कागदाचे छोटे ध्वज यांचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसर्‍या दिवशी असे प्लास्टिकचे आणि कागदी छोटे ध्वज रस्त्यावर, गटारात आणि इतस्ततः विखुरलेले दिसतात. अनेकदा रस्त्यावर चालतांना ते पायाखाली येतात. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाचा होणारा हा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देण्यात आले. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या खरेदी-विक्रीस प्रतिबंध करून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून समितीकडून करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना बजरंग दलाचे श्री. विनोद जैन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेश सावंत, हिंदुत्वनिष्ठ श्री. पांडुरंग गवस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश घाटकर हे उपस्थित होते.

भांडुप

याविषयीचे निवेदन भांडुप पोलीस ठाण्यातही देण्यात आले. ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी भांडुप येथील ‘दीपक ट्यूटोरियल’ या शिकवणीवर्गात समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिकवणीवर्गाचे चालक श्री. राजकुमार शेडगे यांना हे निवेदन देण्यात आले.

रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत, महाविद्यालय आणि पोलीस ठाणी येथे निवेदने

खोपोली येथे पोलीस ठाण्यात निवेदन देतांना धर्माभिमानी
रोहा येथे तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी

पनवेल – ‘राष्ट्रद्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कोलाड, पेण, खोपोली, पनवेल, नागोठणे, खांदेश्वर, अलीबाग आणि रोहा या आठ पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी, तसेच पेण, पनवेल आणि रोहा येथील तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली. नागोठणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले. कोलाड येथील द.ग. तटकरे महाविद्यालय आणि श्री. नानासाहेब धर्माधिकारी कोलाड महाविद्यालय येथील प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.

नवी मुंबईत नेरूळ पोलीस ठाण्यात निवेदन

पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीचे निवेदन नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी वारकरी श्री. विलास पवार, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण व्यवहारे, श्री. कुंदन भोईर, श्री. गोविंद दुबे, श्री. अनंत सातपुते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश सनील हे उपस्थित होते.