इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज जमा करण्याचे दायित्व संबंधित संस्थांचे असेल !
मुंबई, २३ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखणे आणि अवमान होऊ न देणे यासाठी जागरूक रहाणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी आणि योग्य मान राखण्यासाठी प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन, तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा सामने या वेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, पटांगणात किंवा रस्त्यांवर, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या संस्थेने अथवा संघटनेने ते तहसील अथवा जिल्हास्तरीय यंत्रणा यांच्याकडे जमा करावेत. हे राष्ट्रध्वज सुपुर्द करण्याचे दायित्व संबंधित कार्यक्रम आयोजित करणार्या संस्थांचे असेल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. (असे राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी एक खोका ठेवण्याची सोयही केली पाहिजे. नागरिक किंवा विद्यार्थी यांना खाली पडलेले राष्ट्रध्वज त्या खोक्यात टाकण्यास सांगितले पाहिजे. असे संबंधित संस्थेने सांगितल्यास कृतीच्या स्तरावर राष्ट्रध्वजाची विटंबना टाळण्यास साहाय्य होईल ! – संपादक)
जनजागृती करण्यासाठी समिती गठीत !
प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी जनजागृती करण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावर आणि अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.
राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सरकारला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचा आदेश दिला. त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी परिपत्रक काढण्यात येते. |