भारताच्या विरोधात प्रचार करणार्‍या पाकच्या ३५ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी !

पाकचा आणि तेथील नागरिकांचा भारतद्वेष पहाता ते नवीन यू ट्यूब वाहिन्या चालू करून त्यांद्वारे भारतविरोधी प्रचार करतील ! त्यामुळे भारताविरुद्ध कुणाचेही गरळओक करण्याचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने जगभरात निर्माण केला पाहिजे ! त्यासाठी असे कृत्य करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे ! – संपादक 

नवी देहली – भारताच्या विरोधात प्रसार केल्यामुळे भारत सरकारने पाकमधून चालवण्यात येणार्‍या ३५ यू ट्यूब वाहिन्या, तसेच २ ‘इन्स्टाग्राम’ खाती, २ ट्विटर खाती, २ फेसबूक खाती आणि २ संकेतस्थळे यांवर बंदी घातली आहे. या वाहिन्यांच्या वर्गणीदारांची संख्या अनुमाने १ कोटी २० लाख इतकी, तर त्यांवरील व्हिडिओ पाहिलेल्यांची संख्या १३० कोटींहून अधिक आहे.

माहिती आणि प्रसारण खात्याचे सहसचिव विक्रम सहाय म्हणाले की, ही सर्व खाती, वाहिन्या, पाकिस्तानातून चालवल्या जात होत्या. त्यांवरून भारतीय सैन्यदले, जम्मू-काश्मीर, भारताचा परराष्ट्र व्यवहार, जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू यांच्याविषयी खोडसाळ प्रचार केला जात होता. यासह फुटीरवादी विचारसरणीला खतपाणी घालून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केले जात होते.