‘दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा (वय ९१ वर्षे) नोव्हेंबर २०२१ मध्ये स्नानगृहात पडले. त्यामुळे त्यांच्या मांडीला तीन ठिकाणी अस्थिभंग झाला. ‘पू. इंगळेआजोबांचे वय अधिक असल्याने आणि मांडीवर ‘प्लास्टर’ घालता येत नसल्याने शस्त्रकर्म होऊ शकत नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. यावर केवळ ‘औषध घेणे आणि झोपून रहाणे’, हाच उपाय आहे. त्यामुळे पू. इंगळेआजोबा गेल्या दीड मासांपासून पलंगावर झोपून आहेत. त्यांना स्वतःला काहीच करता येत नाही.
पू. इंगळेआजोबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भ्रमणभाष केला होता. तेव्हा ते पुष्कळ आनंदात होते. त्यांच्या मांडीला झालेल्या अस्थिभंगांमुळे त्यांना असह्य वेदना होत असतांनाही ते मला म्हणाले, ‘‘मी आनंदात आहे. हे माझे प्रारब्धभोग आहेत.’’
पू. आजोबांनी स्वतःचे आजारपण आनंदाने स्वीकारले आहे. त्यांचा नामजप अखंड चालू असतो. ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि तेच मला प्रारब्धभोग भोगण्याची शक्ती देत आहेत’, असे ते मला म्हणाले. पू. इंगळेआजोबांना असह्य वेदना होत असतांनाही गुरुदेवांवर अपार श्रद्धा असल्याने पू. आजोबा अखंड आनंदावस्थेत आहेत.
पू. इंगळेआजोबांच्या आनंदावस्थेविषयी ऐकल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा ।’ या भजनपंक्तीची आठवण होते. पू. इंगळे आजोबांनी सर्वांसमोर ‘असह्य शारीरिक त्रास होत असतांना आनंदात कसे रहायचे ?’, याचा आदर्श ठेवला आहे. ‘असे अद्बितीय संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला दिले’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२२)