१. शेतीपासून तयार अन्नपदार्थांपर्यंत सर्वच ठिकाणी होणारा विषारी रसायनांचा वापर चिंताजनक !
‘मॅगी’ या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांविषयी देशात भरपूर चर्चा झाली; मात्र घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते. स्वयंपाकासाठी ज्या भाज्या, धान्य, डाळी, तेल, मीठ इत्यादी वापरले जाते, त्यांतही मानवी आरोग्यास घातक असणारे घटक असू शकतात. अगदी विषाचे अंशही असू शकतात. त्याविषयी मात्र कुणीही बोलतांना दिसत नाही. शेतात, धान्य साठ्याच्या गोदामात, तसेच प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी अन्नपदार्थांमध्ये विविध कारणांसाठी मिसळले जाणारे रासायनिक घटक दुर्लक्ष करण्याजोगे निश्चितच नाहीत.
२. पेठेत मिळणारा ‘विषयुक्त’ भाजीपाला आणि फळे
माझा एक शेतकरी मित्र टोमॅटोला ‘विषाचा गोळा’ म्हणतो; कारण टोमॅटो पिकावर अनेक वेळा, म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद्धा विषारी रसायनांची फवारणी केली जाते. मिरची, आले, काकडी, कोबी, फ्लॉवर इत्यादी भाज्यांचे आणि द्राक्षे, सफरचंद यांसारख्या फळांचेही थोड्या फार फरकाने असेच असते. कोबी, फ्लॉवर ही हिवाळ्यातील पिके आहेत; मात्र या भाज्या आजकाल सर्व ऋतूंमध्ये बाजारात दिसतात. अशी लागवड निसर्गानुकूल नसते. बिगर हंगामी आणि आच्छादित गृहामध्ये (पॉलिहाऊसमध्ये) पिकवल्या जाणार्या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते.
३. रसायन उत्पादन करणार्या नफेखोर आस्थापनांच्या गल्लेभरू वृत्तीमुळे प्रतिदिन नाईलाजाने जनतेच्या पोटात विष जात असणे
शेतात फवारणी केल्यानंतर अगदी दुसर्या – तिसर्या दिवशी तो शेतमाल बाजारात येतो. ‘फवारणी केल्यावर किती काळ असा शेतमाल वापरू नये’, याविषयी शेतकरी आणि ग्राहक दोघेही अंधारात आहेत. रसायन उत्पादन करणारी नफेखोर आस्थापने आणि त्यांचे गावोगावचे एजंट आणि विक्रेते हे रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आणून देणारे लोकशिक्षणाचे कार्य करत नाहीत; कारण शेतकरी जागृत झाला, तर अशा आस्थापनांच्या नफ्यावरच आच येईल. आज जनतेला जे अन्न मिळत आहे, ते एका अर्थाने विषयुक्त असून नाईलाजाने ते विष प्रतिदिन जनतेच्या पोटात जात आहे.
४. शेतीतील हानीकारक रसायने आणि जनुकीय पालट केलेले बियाणे यांच्यामुळे निर्माण झालेली धोकादायक स्थिती
कीटकनाशकांच्या जोडीला तणनाशकांचा वाढता वापर आणि जी.एम्. बियाणे (जनुकीय पालट केलेले बियाणे) या दोन गोष्टी आल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. याची वानगीदाखल २ उदाहरणे –
अ. सन २००० ते २००९ या काळात जनुकीय पालट केलेले खाद्यान्न आणि तणनाशके यांमुळे अर्जेंटिना या देशात बालकांमध्ये कर्करोग तिपटीने वाढला असल्याचा निष्कर्ष अर्जेंटिना शासनाने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे.
आ. रासायनिक खते, तणनाशके आणि कीटकनाशके यांच्या अवशेषांमुळे पंजाबमधील भटिंडा आणि बटाला या परिसरांतील एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरलेले नाही.
(महाराष्ट्राची वाटचालसुद्धा पंजाबच्या दिशेने होत आहे. अशा परिस्थितीत शेजारच्या नैसर्गिक शेतांमधील भूजलसुद्धा दूषित होणारच. म्हणून यापुढे एकट्या-दुकट्याने नव्हे, तर सर्वत्र विषमुक्त शेती होणे आवश्यक आहे. – संकलक)
५. रासायनिक शेतीमुळे जमीन वांझ होण्याच्या मार्गावर !
‘सर्वांच्या भरण-पोषणासाठी रासायनिक शेती लागणारच. नैसर्गिक शेती केल्यास लोक उपाशी मरतील’, असा प्रचार विविध माध्यमांमधून केला जात आहे. हा प्रचार लोकांमध्ये अपसमज पसरवणारा आहे; कारण नैसर्गिक शेतीने रासायनिक शेतीचे उच्चांक मोडल्याचीही अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. नैसर्गिक शेतीमुळे जमीन दरवर्षी सुपीक होत जाते, तर रासायनिक शेतीत याच्या नेमके उलट घडते. रासायनिक शेती चालूच ठेवल्यास पुढच्या पिढ्यांच्या हातात आम्ही कशा प्रकारची जमीन सोपवू ? ती जमिन पूर्णपणे वांझ तर नसेल ?
६. नैसर्गिक खताचा मोठा स्रोत असलेला पालापाचोळा जाळणे चुकीचे
पालापाचोळा, काडीकचरा, पिकांचे अवशेष इत्यादी व्यवस्थितरित्या शेतात परत जायलाच पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर जनजागृती व्हावी लागेल. ज्याचे उत्तम नैसर्गिक खत सिद्ध होते, ती वस्तू पेटवणे शहाणपणाचे कसे ? मात्र उच्चभ्रू वस्त्यांमध्येसुद्धा सफाईवाले पालापाचोळा सहजपणे पेटवून देतात. अनेक शेतकरीसुद्धा शेतातील जैवभारास आगी लावून मोकळे होतात.
७. कर्करोगासारख्या रोगांना आमंत्रण देणारी तणनाशके
आपल्या देशात ‘तणनाशके सुरक्षित आहेत’, असा प्रचार करून ती शेतकर्यांच्या माथी मारली जातात. ‘ती वापरण्याखेरीज पर्याय उरणार नाही’, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. जगभरातील ८० पेक्षा अधिक वैज्ञानिकांच्या गटाने ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. या गटाने तणनाशकांच्या घातक परिणामांचे पुरावे गोळा केले आहेत. त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ग्लायफोसेट तणनाशकाचे वर्गीकरण ‘संभाव्य कर्करोगकारक’ असे केले आहे. ग्लायफोसेटच्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने फक्त कर्करोगच नव्हे, तर वांझपण, नपुंसकता, गर्भपात, जन्मजात दोष, संप्रेरकांची (हॉर्मोन्सची) तोडफोड, मूत्रपिंडाचे विकार असे अनेक रोग होण्याची शक्यता असते. ग्लायफोसेटमुळे संपूर्ण अन्नसाखळीलाच बाधा पोचते. पिकांना आणि जमिनीला अन्नद्रव्य पुरवणारे सूक्ष्म जीव, मासे, अन्य जलचर, उभयचर (बेडूक, कासव, खेकडे इत्यादी), मधमाश्या, पक्षी, सस्तन प्राणी आणि मानवी शरिरातील सूक्ष्म जीव यांवर घातक परिणाम होतो.
८. शेतीतील रसायने अन्नसाखळीत शिरून पूर्ण परिसंस्थेलाच मारक ठरत असणे
शेतीसाठी कोणतेही तंत्रज्ञान वापरले, तरी ते पर्यावरणस्नेहीच असायला हवे; कारण हवा, पाणी, माती हे सजीवांचे मूलाधार आहेत. त्यांच्या आरोग्यावर माणूस, प्राणी आणि अन्य सजीव यांचे आरोग्य अवलंबून असते. ‘शेतात विष घातल्यानंतर ते विष अन्न आणि पाणी यांत येणारच. गिधाडांपासून गांडुळांपर्यंतचे सर्व जीव बाधित होणारच’, याचे भान प्रत्येकाला असायला हवे. आज मी जमिनीत विष ओतत आहे. शेती म्हणजे साप, विंचू, गांडूळ, मुंग्या, मुंगळे, जमिनीतील सूक्ष्म जीव, मासे, खेकडे, बेडूक, पशू-पक्षी, वनस्पती या सर्वांची परिसंस्था (इको सिस्टिम) आहे. या परिसंस्थेला बाधा पोचली की, सर्व अन्नसाखळी कोलमडणार. एकदा साखळी तुटली, तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातील नाही.
(रासायनिक शेती आरोग्यासाठी किती हानीकारक आहे, हे या लेखातून लक्षात येते. बाजारातील भाजीपाल्यावर विषारी रसायनांची फवारणी केलेली असल्याने प्रत्येकाने स्वतःपुरता भाजीपाला स्वतःच पिकवून खाणे आवश्यक बनले आहे. घरच्या घरी थोड्याशा जागेतही दैनंदिन जेवणात आवश्यक असलेला भाजीपाला पिकवता येतो. यासाठीच सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत सनातनचे अनेक साधक घरच्या घरी भाजीपाला पिकवू लागले आहेत. – संकलक)
– श्री. वसंत फुटाणे, विषमुक्त सेंद्रिय शेतकरी, अमरावती.
(साभार : ‘शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उपाय’ या मासिक ‘वनराई’मधील लेखाचा संपादित अंश)
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
लागवडीसंबंधी प्रायोगिक लिखाण पाठवा !‘लागवड हा एक प्रायोगिक विषय आहे. यामध्ये लहान लहान अनुभवांनाही पुष्कळ महत्त्व असते. जे साधक आतापर्यंत लागवड करत आले आहेत, त्यांनी त्यांना लागवड करतांना आलेले अनुभव, झालेल्या चुका, त्या चुकांतून शिकायला मिळालेली सूत्रे, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पाठवावे. हे लिखाण दैनिकातून प्रसिद्ध करता येईल. यातून इतरांनाही शिकता येईल. लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संगणकीय पत्ता : [email protected] |
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Assam Flood : आसाममध्ये महापूर : ४१ जणांचा मृत्यू !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !