‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ या चित्रपटांच्या गुन्हेगारी कथेच्या प्रभावामुळे अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या !

अल्पवयीन मुलांनी बनवली होती स्वतःची गुंड टोळी !

चित्रपटांतील नकारात्मक कथेचा लहान मुलांवर परिणाम होतो, हेच ही घटना स्पष्ट करते. त्यामुळे अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला पाहिजे आणि समाजानेही अशा चित्रपटांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! – संपादक

नवी देहली – येथील जहांगीरपुरी भागातील बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात ३ अल्पवयीन मुलांनी एका २४ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलांना अटक करण्यात आली आहे. या मुलांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. त्यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळीही बनवली होती. ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट आणि ‘वेब सीरिज’ यांत चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे या अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी हत्या केल्यानंतर एक व्हिडिओही बनवला आणि तो ‘इन्स्टाग्राम’ ‘अ‍ॅप’वर प्रसारित केला. (यातून ही मुले तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पुढारलेली आहेत, हे लक्षात येते; मात्र त्यांच्यावर योग्य संस्कार न झाल्यामुळे केवळ आधुनिक शिक्षण उपयोगी पडत नाही, हेही ही घटना दर्शवते ! – संपादक)

२. पोलीस उपायुक्त (उत्तर पश्‍चिम) उषा रंगनानी यांनी सांगितले की, ‘सीसीटीव्ही फुटेज्’वरून मृत आणि आरोपी यांच्यामध्ये भांडण झाल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या टोळीला ‘बदनाम गँग’ असे नाव दिले होते.