सातारा, २१ जानेवारी (वार्ता.) – गत ६ मासांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात चिकित्सक (फिजिशियन) नव्हते. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत होते; मात्र आता जिल्हा शासकीय रुग्णालयात चिकीत्सकाची नियुक्ती झाली असल्यामुळे सामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
आधुनिक वैद्य ओंकार सांगळे हे नुकतेच जिल्हा शासकीय रुग्णालयात पूर्णवेळ रुजू झाले आहेत. गत काही मासांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पूर्णवेळ आधुनिक वैद्य असणे आवश्यक होते. हृदयरोग असणार्यांचीही संख्या रुग्णालयात अधिक आहे. यावरही आता तातडीने उपचार होणार आहेत. यापूर्वीच्या आधुनिक वैद्यांना कामाचा अतिरिक्त ताण आल्यामुळे त्यांनी त्यागपत्र दिले होते. तेव्हापासून हे पद रिक्त होते. कोरोनाच्या गत २ लाटांमध्ये खासगी रुग्णालयातून आधुनिक वैद्य आणावे लागले होते. तेही रुग्ण अतीगंभीर स्वरूपाचा असेल, तरच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत होते; मात्र आता सांगळे यांच्यामुळे सामान्य रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.