गुळुंब (जिल्हा सातारा) येथे चित्रीकरण स्थळी दमदाटी करणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

किरण माने वादात संभाजी ब्रिगेडची उडी ! ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर ठिय्या आंदोलन

सातारा, २१ जानेवारी (वार्ता.) – वाई तालुक्यातील गुळुंब या गावात ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण चालू होते. या ठिकाणी जाऊन दमदाटी करणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर भुईंज पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

(सौजन्य : Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स)

याविषयी भुईंज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून कलाकार किरण माने यांना गैरवर्तनाच्या कारणावरून मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. याविषयी किरण माने यांनी संबंधित वृत्तवाहिनीच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माने यांनी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती; मात्र सर्व घडामोडी घडूनही माने यांना पुन्हा मालिकेमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

सातारा पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रीकरण स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही २० जानेवारी या दिवशी दुपारी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करणारे व्यवस्थापक आणि कलाकार यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी भुईंज पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत गुन्हा नोंद केला.