नाना पटोले यांना अटक होईपर्यंत साखळी उपोषण चालूच राहील ! – मंगलप्रभात लोढा, आमदार आणि मुंबई अध्यक्ष, भाजप

मुंबई येथे भाजपचे साखळी उपोषण चालू !

नाना पटोले यांना अटक होण्याच्या मागणीसाठी मुंबई येथे साखळी उपोषण करतांना भाजपचे कार्यकर्ते

मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, या मागणीसाठी १९ जानेवारीपासून मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपच्या वतीने मंत्रालयाच्या परिसरातील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे. जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्यात येईल, अशी चेतावणी आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली. पटोले यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, नाना पटोले यांचे वागणे म्हणजे ‘विनाशकाले विपरितबुद्धी ।’, असे झाले असून नाना पटोले वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत. आधी पंजाब आणि आता महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांचा मोदी यांना जिवे मारण्याचा उद्देश जनतेसमोर उघड झाला आहे. या संदर्भात मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

या आंदोलनात भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राजहंस सिंह, भाजपचे मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.