विमानांना ‘५ जी’ इंटरनेटच्या धोक्यामुळे एअर इंडियाची अमेरिकेला जाणारी १४ उड्डाणे रहित !

नवी देहली – नवीन ‘५ जी’ इंटरनेट तंत्रज्ञानाचा विमानांवर परिणाम होऊ शकत असल्यामुळे ‘एअर इंडिया’ या भारतीय विमान वाहतूक आस्थापनासह अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान आस्थापनांनी त्यांची अमेरिकेला जाणारी उड्डाणे रहित केली आहेत. काही आस्थापनांनी ‘५ जी’ इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असलेली विमाने पालटली आहेत. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

१. काही विमान आस्थापनांनी सांगितले की, जगभरात वापरल्या जाणार्‍या ‘बोईंग ७७७’ या विमानांवर नवीन ‘हाय-स्पीड वायरलेस’ सेवेचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चेतावणी आम्हाला देण्यात आली आहे. सेवा चालू ठेवण्यासाठी वेगवेगळी विमाने वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२. दुसरीकडे बोईंग आस्थापनाने ‘बोईंग ७७७’ या विमानांच्या अमेरिकेतील वाहतुकीला कुठलाही धोका नाही’, असे सांगत वाहतुकीला अनुमती दिली आहे. यानंतर ‘अमेरिकेला जाणार्‍या एअर इंडियाच्या पहिल्या विमानाचे सकाळी उड्डाण झाले’, असे एअर इंडियाने सांगितले.

३. भारतीय विमान वाहतूक नियामक विभागाचे प्रमुख अरुण कुमार म्हणाले की, अमेरिकेत ‘५ जी’ इंटरनेट सेवेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

‘५ जी’चा विमानांवर होणारा परिणाम !

‘५ जी’च्या प्रभावामुळे विमानाच्या ‘रेडिओ अल्टिमीटर’वर ‘इंजिन’ आणि ‘ब्रेकिंग सिस्टम’ थांबू शकतात. यामुळे धावपट्टीवर विमाने रोखण्यात समस्या येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.