वर्धा येथील अर्भकांचे गर्भपात केल्याचे प्रकरण
सूचना देऊनही ४ दिवस विलंबाने तक्रार प्रविष्ट करणारा आरोग्य विभाग ! – संपादक
वर्धा – जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या परिसरातील भूगर्भातून पोलिसांनी गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणाच्या अन्वेषणातून विविध खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी रुग्णालयात आढळलेली अनियमितता आणि गैरकारभार यांच्या संदर्भात आरोग्य विभागाला तक्रार प्रविष्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या. ४ दिवस उलटूनही या प्रकरणात आरोग्य विभागाने तक्रार प्रविष्ट केली नव्हती. याविषयी १७ जानेवारीच्या रात्री आर्वी येथील वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे यांनी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आधुनिक वैद्या रेखा कदम, आधुनिक वैद्य नीरज कदम, आधुनिक वैद्य शैलजा कदम आणि आधुनिक वैद्य कुमारसिंग कदम यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणातील २ आरोपी आधुनिक वैद्या रेखा कदम आणि आधुनिक वैद्य नीरज कदम हे प्रथमच पोलिसांच्या कह्यात असून आधुनिक वैद्य कुमारसिंग कदम आणि आधुनिक वैद्य शैलजा कदम या दोघांना लवकरच अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून लैंगिक अत्याचारासह गर्भापाताचे अन्वेषण केले जात असतांना रुग्णालयाचा गैरकारभार समोर आला. आधुनिक वैद्य नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० सहस्र रुपये मानधन तत्त्वावर जानेवारी २०१८ पासून स्त्री रोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत.