कला क्षेत्रात निपूण असूनही एकमेकांशी आदराने वागणारे, संगीत आणि नृत्य या मोहमयी जगात वावरत असूनही संतपद गाठलेले पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक !

कला क्षेत्रात निपूण असूनही एकमेकांशी आदराने वागणारे, संगीत आणि नृत्य या मोहमयी जगात वावरत असूनही संतपद गाठलेले ठाणे येथील पू. राजकुमार केतकर (वय ७३ वर्षे) आणि डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) !

‘ठाणे येथील पू. राजकुमार केतकर आणि डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील शास्त्रीय संगीत गायक पू. किरण फाटक हे वर्ष २०१९ मध्ये २ दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना संगीत विभागातील साधकांना त्यांच्या सत्संगाचा लाभ झाला. त्यांच्या सहवासात संगीत विभागातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग : गायनसाधना

कु. मयुरी आगावणे, कु. म्रिणालिनी देवघरे आणि श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांना प्रथमच पाहिल्यावर ‘हे दोघेही संत असतील’, असे आम्हाला जाणवले.’

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. राजकुमार केतकर

१. सभोवताली अनेक व्यसनी माणसे वावरत असतांनाही स्वतःतील चांगूलपणा टिकवून ठेवणे

‘पू. फाटककाका आणि पू. केतकरकाका यांच्या आयुष्यात व्यसन असलेले अनेक कलाकार अन् व्यक्ती आल्या, तसेच त्यांच्या संपर्कात अयोग्य वर्तन करणारेही अनेक जण आले, तरीही त्यांनी त्यांच्यातील चांगूलपणा टिकवून ठेवला आहे. ‘सध्याच्या काळातील अयोग्य वातावरणात आणि तेही संगीत-नृत्य यांसारख्या क्षेत्रांत त्यांनी स्वतःतील चांगूलपणा टिकवून ठेवला’, याचे मला फारच आश्चर्य वाटले. त्या दोघांचा संत म्हणून सन्मान झाल्यावर मला त्याचे कारण लक्षात आले.

पू. किरण फाटक

२. दोघांनाही पैशाचा मोह नसून ते समाधानी आणि धार्मिक वृत्तीचे आहेत.’

सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘पू. फाटककाका आणि पू. केतकरकाका दोघेही आपापल्या कलाक्षेत्रात निपुण आहेत, तरीही ते एकमेकांशी आदराने वागतात.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१८.८.२०२१)

शास्त्रीय संगीत गायक पू. किरण फाटक यांची संगीत विभागातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, कु. मयुरी आगवणे, कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम् विशारद) आणि सौ. अनघा जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

१. ‘पू. फाटककाका चांगले गायक आहेत. ते अत्यंत साधे आणि निर्मळ आहेत.

२. जिज्ञासू वृत्ती

पू. काका आश्रम पहातांना सर्व गोष्टी जिज्ञासेने जाणून घेत होते. त्यांना एखादे सूत्र समजले नाही, तर ते त्यासंबंधी विचारून घ्यायचे.

३. इतरांचा विचार करणे

कु. तेजल पात्रीकर यांनी पू. काकांना ‘आध्यात्मिक त्रास असलेले साधक आणि त्रास नसलेले साधक यांवर शास्त्रीय संगीताचा काय परिणाम होतो ?’ या संदर्भात घेण्यात येणार्‍या प्रयोगांचे नियोजन सांगितले. तेव्हा त्यांनी ते सहजतेने स्वीकारले. त्या वेळी त्यांनी ‘स्वतःला सोयीचे कसे आहे, यापेक्षा इतरांना सोयीचे कसे आहे ?’, असा विचार केला.

४. स्वतःला अवगत असलेली संगीतकला इतरांना देण्याची तळमळ असणे

२६.१.२०२० या दिवशी मी (सौ. अनघा जोशी) सकाळी ७ वाजता पू. फाटककाका यांना चहा देण्यासाठी गेले होते. तेव्हा ते ‘त्यांनी संगीतावर सिद्ध केलेल्या धारिकांपैकी कोणत्या धारिका साधकांना देऊ शकतो ? साधकांना आणखी काय द्यायला हवे ?’, याचा विचार करत होते. प्रत्यक्षात पू. काका साधकांना एकदाच भेटले होते, तरीही त्यांची स्वतःकडे असलेले कलेचे सर्व ज्ञान साधकांना देण्याची तळमळ पाहून मला भगवंताच्या चरणी कृतज्ञता वाटली.

५. अन्य गायकांकडून शिकण्याची वृत्ती

पू. फाटककाका त्यांचा अनुभव सांगतांना म्हणाले, ‘‘एकदा एक माणूस माझ्यासमोर गात होता. त्याचे गाणे ऐकून मला वाटले, ‘याचे स्वर किती छान लागले आहेत. हा किती छान गात आहे. याच्यापुढे मी एवढे संगीत शिकून काहीच उपयोग नाही.’’ यातून ‘पू. काकांमध्ये समोरच्या कलाकाराविषयी जाण आणि त्याच्याकडून शिकण्याची वृत्ती आहे’, असे मला तीव्रतेने जाणवले.

६. गुरूंप्रती अपार निष्ठा असणे

पू. फाटककाका बोलत असतांना ते प्रत्येक वाक्य ‘गुरु’ या शब्दाने आरंभ करून ‘गुरूंची कृपा, गुरुतत्त्वाची कृपा’ याने शेवट करत होते. तेव्हा त्यांची गुरूंप्रती असलेली अपार निष्ठा जाणवली.’

कु. मृण्मयी केळशीकर

१. ‘पू. काका गात असतांना ‘त्यांच्या शरिरातून निळा आणि मस्तकातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

२. ते गातांना त्यांचा उत्कट भाव जाणवत होता.

३. ‘त्यांचे स्वर निर्गुणाकडे जात आहेत’, असे मला जाणवले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१८.८.२०२१)

पू. राजकुमार केतकर यांच्या पत्नी सौ. वैशाली केतकर आणि पू. किरण फाटक यांच्या पत्नी सौ. संजीवनी फाटक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

यजमानांचे निरीक्षण करून कला आत्मसात् करणे

सौ. वैशाली केतकर

‘पू. राजकुमार केतकर यांच्या पत्नी सौ. वैशाली केतकर आणि पू. किरण फाटक यांच्या पत्नी सौ. संजीवनी फाटक या दोघींनी नृत्य अन् संगीत यांचे शिक्षण घेतले नसतांनाही त्यांनी त्या कला त्यांच्या यजमानांचे निरीक्षण करून आत्मसात् केल्या आहेत. त्या त्यातील बारकावे आम्हाला (सत्संगाला उपस्थित असणार्‍या साधकांना) अतिशय चांगल्या प्रकारे सांगत होत्या. त्यांचे यजमान आणि त्यांची कला यांवर असलेले प्रेम पाहून आम्हाला आनंद झाला. त्यांची यजमानांशी असलेली एकरूपता पाहून आम्हाला कृतज्ञता वाटली. ‘आजच्या काळात असे उदाहरण पहायला मिळणे दुर्मिळच आहे’, असे मला वाटले.

सौ. संजीवनी फाटक

सौ. केतकरकाकूंनी ‘पू. केतकरकाका नृत्यातील कोणता भाग अधिक चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांच्याकडून आम्ही कोणती माहिती घेतली, तर त्याचा अधिक लाभ होईल’, अशी मोलाची माहिती त्यांनी आम्हाला सांगितली.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक