|
मुंबई, १८ जानेवारी (वार्ता.) – पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागूनच असलेल्या शीवगडावरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे या गडाची दुरवस्था झाली आहे. आणखी दुर्लक्ष झाल्यास यावरील बांधकाम नामशेष होण्याची भीती आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या बाजूलाच असूनही हा गड पूर्णपणे दुर्लक्षित आहे. एकंदरीत गडाची स्थिती पहाता पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक वास्तू असूनही ती टिकून रहावी, यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.
१. शीवगड पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ‘प्राचीन संरक्षित स्मारक’ आहे.
२. शीव (सायन) येथील एका उंच टेकडीवर मोठा बुरुज बांधण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्याचाही परिसर दिसतो, इतकी ही टेकडी उंच आहे.
३. बुरुजाच्या आतमध्ये ६ खोल्या आहेत, तसेच गडावर प्राचीन तोफ पडून आहे. गडावर पाणी साठवण्यासाठी साधारण १५ फूट खोल तळे आहे. शत्रूची टेहाळणी करण्यासाठी गडावर खिडक्या आहेत.
४. गडाच्या आजूबाजूला विविध वृक्षांचे घनदाट जंगल आहे. ही टेकडी अत्यंत निसर्गरम्य असून आजूबाजूचे नागरिक सकाळी व्यायामासाठी येथे येतात. अनेक पर्यटक, तसेच विद्यार्थीही सुटीच्या दिवशी येतात.
आहे ती वास्तू टिकवून ठेवण्याचाही प्रयत्न नाही !
गडाच्या दुरवस्थेविषयी गडप्रेमींनी सातत्याने केलेल्या मागणीनंतर वर्ष २००९ मध्ये गडाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र निधीच्या अभावामुळे हे काम बंद करण्यात आले. त्यानंतर या गडाच्या दुरुस्तीकडे पुरातत्व विभाग आणि सरकार यांकडून पूर्णत: दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम म्हणजे जुलै २०२१ मध्ये गडाच्या बुरुजाच्या भिंती कोसळल्या. सद्यःस्थितीत गडावरील सर्वच ठिकाणचे बांधकाम ढासळले आहे.
गडावर येणार्या प्रेमीयुगुलांनी गडाच्या भिंतींवर स्वत:ची नावे लिहिल्यामुळे गडाच्या भिंती विद्रूप झाल्या आहेत. या ठिकाणी आवश्यक सूचनांचा फलकही लावण्यात आलेला नाही. तोफेसारख्या ऐतिहासिक वस्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या माहितीचा साधा फलकही तेथे लावण्यात आलेला नाही.
शीवगडाची माहिती
मुंबई बेट पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली असतांना शेजारच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी वर्ष १६६९ ते १६७७ या कालावधीत शीवगड बांधला. पुढे हा गड ब्रिटिशांनी कह्यात घेतल्यानंतर मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर गेराई ऑगियर यांनी या गडाची पुनर्बांधणी केली. या गडाचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिशांनी तेथे सैन्यतळ उभारला होता. ब्रिटिशांचा एक सेनाधिकारी आणि ३१ सैनिक कायमस्वरूपी या गडाच्या रक्षणासाठी ठेवण्यात आले होते.