‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप लांबवला जात आहे ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप (छायाचित्र सौजन्य : ANI)

कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रात जवळपास २ मासांपासून ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमीवर लक्ष असून ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप लांबवला जात आहे, असा आरोप भाजपचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एस्.टी.’ कर्मचारी हे केवळ सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सुविधा चालू करा, असे म्हणत आहेत, यात चूक काय आहे ? महाविकास आघाडीला ‘एस्.टी.’चे जाळे मोडून काढायचे आहे आणि कोणत्यातरी खासगी वाहतूकवाल्यांशी कंत्राट झाले आहे. त्यामुळेच ‘एस्.टी.’च्या संपावर तोडगा काढण्यात येत नाही.’’