बुंदेलखंड (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातून चोरी झालेली देवीची प्राचीन मूर्ती इंग्लंडच्या बागेत !

मकरसंक्रातीच्या निमित्ताने भारताकडे मूर्ती सुपुर्द !

भारतातील देवतांच्या प्राचीन मूर्तींची तस्करी होणे, हे पुरातत्व विभागाला लज्जास्पद ! प्राचीन मूर्ती आणि धार्मिक स्थळे यांच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेला हा विभाग जर सक्षमपणे कार्य करत नसेल, तर हा विभाग विसर्जित करा ! – संपादक

चोरी झालेली देवीची प्राचीन मूर्ती

लंडन – बुंदेलखंड (उत्तरप्रदेश) येथील एका मंदिरातून सुमारे ४० वर्षांपूर्वी चोरी झालेली देवीची मूर्ती इंग्लंडमधील एका बागेत असल्याचे समोर आले. ही मूर्ती १० व्या शतकातील असून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ती भारताला सोपवण्यात आली आहे. आता ही मूर्ती नवी देहलीच्या भारतीय पुरातत्व विभागाला सोपवण्यात येणार आहे.
ही मूर्ती बुंदेलखंडमधील बांदा जिल्ह्यातील लोखरी मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘योगिनी’ समूहातील एक मूर्ती आहे. योगिनी हा तांत्रिक उपासनेशी निगडित शक्तीशाली देवींचा एक समूह आहे. समूहाच्या रूपात त्यांची पूजा केली जाते. ऑक्टोबर २०२१ मध्ये उच्चायुक्ताला या मूर्तीची माहिती देण्यात आली होती. इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त गायत्री इस्सर कुमार यांना ही मूर्ती सोपवण्यात आली. गायत्री कुमार यांनी त्यांच्या पॅरिसमधील कार्यकाळामध्येही योगिनीची आणखी एक मूर्ती कह्यात घेऊन भारतात परत पाठवली होती. ही मूर्तीही लोखरीच्या त्याच मंदिरातून चोरण्यात आली होती. वर्ष २०१३ मध्ये त्या मूर्तीची देहलीच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये स्थापना करण्यात आली आहे.