भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापकास फैलावर घेतले !

अतीवृष्टीचे साहाय्य आणि पिकविम्याची आलेली हानीभरपाई शेतकर्‍यांना न दिल्याचे प्रकरण

भाजपच्या आमदार श्वेता महाले

बुलढाणा – जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अतीवृष्टीचे मिळालेले साहाय्य आणि पिकविम्याची आलेली हानीभरपाई शेतकर्‍यांना दिली जात नव्हती. ती रक्कम परस्पर शेतकर्‍यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात होती. त्यामुळे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी अधिकोषाच्या व्यवस्थापकास फैलावर घेऊन शेतकर्‍यांना त्वरित साहाय्य देण्यास सांगितले. या वेळी महाले यांनी व्यवस्थापकांना क्षमा मागायला लावली. या वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर व्यवस्थापकाने शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास प्रारंभ केला.

आमदार महाले म्हणाल्या की, बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकांविरुद्ध अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या मनमानीसह उद्धट वागणुकीविषयी तक्रारी केलेल्या आहेत. शेतकर्‍यांना अतीवृष्टीचे मिळालेले साहाय्य आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता अनधिकृतपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केले जात होते. त्यामुळे बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारला.