पंतप्रधानांच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे राहिली ?

५ जानेवारी २०२२ या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून परतले. त्या वेळी पंतप्रधानांनी ‘पंजाबमधून मी जिवंत परतलो’, असे म्हणत त्याबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार विशिष्ट शैलीत व्यक्त केले. ज्यामुळे अवघ्या देशात खळबळ माजली. त्याला कारणही तसेच होते. दौर्‍याच्या कालावधीत पंतप्रधानांचा ताफा आंदोलनकर्त्यांनी एका पुलावर अचानक अडवला. पंतप्रधान २० मिनिटे खोळंबून होते. या वेळी ‘आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या मार्गात कसे जमले ? हे राज्याच्या पोलीस यंत्रणेला ठाऊक नव्हते का ? त्यांनी पंतप्रधानांचा मार्ग मोकळा का ठेवला नाही ?’, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. या सर्व प्रश्नांची उकल महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देतांना केली. माजी पोलीस महासंचालक दीक्षित यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अतीमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व पार पाडले आहे. या प्रकरणाविषयी त्यांचे म्हणणे येथे देत आहोत.

१. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या वेळी त्यांची सुरक्षाव्यवस्था कशी असते ?

अ. एखाद्या राज्यात पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाल्यावर जवळपास ११ दिवस आधीच त्याविषयी संबंधित राज्याला कळवले जाते.

आ. पंतप्रधान जेव्हा दौरा करतात, तेव्हा रस्ते मार्गावरील त्यांच्या सुरक्षेचे नियोजन करणे क्रमप्राप्त असते. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाचे (एस्.पी.जी.) सैनिक तैनात असतात. पंतप्रधानाच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था करणे, हे या दलाचे मुख्य कर्तव्य असते.

पंतप्रधान पंजाबच्या दौर्‍यावर असतांना खराब हवामानामुळे रस्त्याने प्रवास करावा लागू शकतो, ही शक्यता गृहीत धरून त्यांच्या पर्यायी प्रवासमार्गाचे नियोजन करणे आवश्यक होते.

श्री. प्रवीण दीक्षित

२. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या वेळी राज्य सरकारचे उत्तरदायित्व

गृहमंत्रालयाच्या ‘ब्लू बूक’नुसार पंतप्रधानांना सुरक्षा पुरवली जाते. (‘ब्लू बूक’ म्हणजे मार्गदर्शक सूचना आणि नियमावली यांचा संग्रह. यामध्ये अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेसंबंधी पाळायच्या नियमांची माहिती असते.) त्यानुसार

अ. पंतप्रधान ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत, तो मार्ग प्रवासासाठी सुरक्षित आहे का ? याची निश्चिती करणे.

आ. मार्गामध्ये कोणतेही संशयास्पद वाहन असल्यास ते तात्काळ दूर करणे.

इ. मार्गावर उंच इमारती असल्यास त्यामुळे काही धोका उद्भवू शकतो का ? याची पडताळणी करणे. संभाव्य धोका असल्यास त्या ठिकाणी आधीच सुरक्षा अधिकारी नेमणे.

ई. पंतप्रधानांच्या मार्गात कुणी निदर्शने करणार असतील, तर त्यांचा आधीच प्रतिबंध करणे. निदर्शनाचा एखादा प्रसंग घडणारच असेल, तर पर्यायी मार्गाची व्यवस्था आधीच करणे.

उ. सुरक्षित स्थानाची व्यवस्था करणे.

ऊ. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण दौर्‍याच्या कालावधीत पंतप्रधानांच्या ताफ्यासमवेत राज्याचे पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असावेत.

३. पंजाब सरकारकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटी

अ. पंतप्रधानांच्या संपूर्ण दौर्‍याच्या कालावधीत राज्याचे मुख्य पोलीस महासंचालक, वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव आदींनी समवेत असणे अनिवार्य आहे; परंतु प्रत्यक्षात ते अनुपस्थित होते. त्यांची वाहने ताफ्यात धावत होती; मात्र ती रिकामी होती.

आ. विशेष म्हणजे जेव्हा पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षकांनी हवाई मार्गाऐवजी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुख्य पोलीस महासंचालकांनी ‘नियोजित रस्ता सुरक्षित आहे. प्रवास करण्यास हरकत नाही’, असे कळवले होते. प्रत्यक्षात जेव्हा पंतप्रधानपदाचा ताफा उड्डाणपुलावर पोचला, तेव्हा शेतकरी तिथे निदर्शने करण्यासाठी जमलेले होते. त्यांचा पोलिसांनी आधीच बंदोबस्त केला नव्हता आणि घटनास्थळी पोलीस उपमहानिरीक्षकही उपस्थित नव्हते. काही वेळानंतर पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक घटनास्थळी पोचले; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

इ. एका बाजूला पंतप्रधानपदाचा ताफा अडकून पडला असतांना दुसरीकडे निदर्शनकर्त्यांना हटवण्याचे उत्तरदायित्व कुणीही घेत नव्हते.

ई. शेतकरी अमृतसरच्या बाहेरील छब्बा गावात पंतप्रधानांच्या दौर्‍याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते आणि तेथून ते फिरोजपूरला रवाना झाले होते. असे असतांनाही पंजाब सरकारने ते गांभीर्याने घेतले नाही आणि शेतकर्‍यांना रोखण्यासाठी आधीच ठोस पावले उचलली नाहीत.

यातून आपण दोन माजी पंतप्रधानांच्या (काँग्रेसचे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या) हत्या झाल्याच्या प्रकरणांतून काही शिकलो नाही, हेच अधोरेखित होते.

४. …यासाठी पंतप्रधान मोदींची सुरक्षा आहे महत्त्वाची !

अ. महाराष्ट्र्रात वर्ष २०१७ मध्ये जेव्हा कोरेगाव-भीमा दंगल झाली, तेव्हा काही शहरी नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अन्वेषणात एक पत्र हाती लागले. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कारस्थानाची माहिती होती. यासाठी विविध शस्त्रांची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती. पुढे राष्ट्रीय अन्वेषण पथकाने अन्वेषण करून या शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई केली. सर्वाेच्च न्यायालयानेही ही कारवाई वैध ठरवली.

आ. पंजाबच्या दौर्‍याच्या वेळी ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी होते, तो हुसैनीवाला हा भाग वर्ष १९७१ नंतर भारतात आला. हा भाग पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जर देशाचे पंतप्रधान येत असतील, तर ‘ते कोणत्या पक्षाचे आहेत ?’, हे पहाणे महत्त्वाचे नसते, तर ‘ते देशाचे पंतप्रधान आहेत’; म्हणून त्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची असते. ज्यात पंजाब सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

५. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ट्वीट’ करत या सर्व घटनेची माहिती दिली. यानंतर गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचे पुढील अन्वेषण केले जात आहे.

(साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट’ वृत्तसंकेतस्थळ, ७ जानेवारी २०२२)