राज्यात यापुढे छोट्या दुकानांनाही नावाची पाटी मराठीत लावावी लागणार !

पळवाट काढणार्‍यांसाठी कायद्यात सुधारणा करणार !

अन्य लिपींतील अक्षरांपेक्षा मराठी अक्षरे लहान चालणार नाहीत !

शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! – संपादक 

सुभाष देसाई

मुंबई – दहाहून अधिक कामगार असलेली आस्थापने आणि दुकाने यांना नावाची पाटी मराठी लावण्याविषयी कायदा आहे. या कायद्यातून पळवाट काढत काही दुकानदार दुकानाच्या नावाची पाटी मराठीत लावत नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे ‘महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७’ यामध्ये सुधारणा करून १० हून अल्प कामगारसंख्या असलेल्या दुकानांनाही नावाची पाटी मराठी भाषेत लावणे अनिवार्य केले आहे. १२ जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भाषामंत्री सुभाष देसाई याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘दुकानांच्या नावांविषयी काही तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. येत्या अधिवेशनात कायद्यातील सुधारणा सभागृहात संमत करण्यात येईल. यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.’’