युवकांनो, वर्ष २०४७ मधील ‘समृद्ध भारत’ पहाण्यासाठी आतापासून उत्साहाने प्रयत्न करा ! – पंतप्रधान

२५ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी युवकांना मार्गदर्शन

नवी देहली – आज भारत ‘स्टार्टअप’च्या (नवीन उद्योगधंदे चालू करण्याच्या) सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्‍वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी २५ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवा’त ऑनलाईन पद्धतीने बोलतांना केले. १२ जानेवारी या दिवशी झालेल्या स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीच्या निमित्ताने पुदुचेरी येथे हा उत्सव चालू झाला आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते.

पंतप्रधानांच्या भाषणांतील काही महत्त्वपूर्ण सूत्रे

१. ‘वोकल फॉर लोकल’ (स्थानिक उद्योग-धंद्यांना चालना मिळण्यासाठी सरकारने चालू केलेली मोहीम) मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे. तुम्ही काही खरेदी करायला गेलात, तर त्या वस्तूंना भारतीय मातीचा सुगंध येतो का ? तसेच त्या वस्तूच्या माध्यमातून देशातील गरीब मजुरांना लाभ होईल का ?, हे पहावे. ज्या मातीत स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांच्या शिकवणीचा सुगंध आहे, त्या मातीशी आपण एकनिष्ठ रहायला हवे. ‘आत्मनिर्भर भारता’च्या मोहिमेला पुढे घेऊन जाण्यातच आपल्या बर्‍याच समस्यांचे निवारण आहे.

(सौजन्य – Narendra Modi)

२. स्वच्छता अभियानात युवकांचे मोठे योगदान आहे.

३. १५ ते १८ वर्षे वयाच्या २ कोटींहून अधिक युवकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मुलींचे विवाह करता येण्यासाठीचे वय हे १८ वरून २१ वर्षे करण्यात आले आहे. यामुळे मुलींनाही शिक्षणासाठी अधिक वेळ मिळू शकणार आहे.