शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांकडून भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई; मात्र एकही रुपयाही भरला नाही कर !

सरकार चौकशी करणार !

  • चिनी आस्थापने कर चूकवत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? त्यांनी वेळीच या आस्थापनांना याविषयी जाब का विचारला नाही ? सरकारने अशा आस्थापनांची हाकालपट्टी केली पाहिजे, तसेच त्यांच्याकडून कर वसूल न करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक
  • सर्वसामान्य नागरिकांनी कर चूकवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी यंत्रणांची तत्परता करचूकवेगिरी करणार्‍या शत्रूराष्ट्राच्या आस्थापनांच्या संदर्भात का दिसत नाही ? – संपादक
  • अशा भारतविरोधी आस्थापनांवर आता देशप्रेमी नागरिकांनीही बहिष्कार घालून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी ! – संपादक

नवी देहली – शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांनी भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई करून एक रुपयाही कर भरला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भारत सरकार आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

भारतातील कर चूकवण्यासाठी या चिनी आस्थापनांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती आणि नफा लपवल्याचा आरोप केला जात आहे. या आस्थापनांच्या भ्रमणभाषची भारतात प्रचंड प्रमाणात विक्री होऊनही ही आस्थापने तोट्यात असल्याचे त्यांच्याकडून सरकारला सांगितले जात आहे. यासह एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या वर्षांत चिनी आस्थापनांनी केलेल्या आर्थिक अहवालाच्या प्राथमिक मुल्यांकनात त्रुटी आढळून आल्या असून करचोरी, कमाई लपवणे आणि तथ्यांमध्ये फेरफार करणे, असे अपप्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे या आस्थापनांच्या व्यवसाय पद्धतीचीही चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या वेगवेगळ्या अन्वेषण यंत्रणांनी विविध चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या.

भारतात भ्रमणभाषच्या व्यवसायात चिनी आस्थपनांचेच वर्चस्व : भारतीय भ्रमणभाष आस्थापनांचा वाटा १० टक्यांपेक्षाही अल्प !

भारतात भ्रमणभाषच्या व्यवसायात चिनी आस्थापनांच्या वर्चस्वामुळे भारतीय आस्थापने कमकुवत झाली आहेत. लावा, कार्बन, मायक्रोमॅक्स आणि इंटेक्स यांसारख्या भरतीय भ्रमणभाष आस्थापनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. भ्रमणभाषच्या व्यवसायात भारतीय आस्थापनांचा वाटा १० टक्क्यांपेक्षाही अल्प आहे.