कोल्हापूर, ११ जानेवारी – जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयाविषयी कोरोना नियमांचा भंग करून मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी सार्वजनिक आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह ४०० कार्यकर्त्यांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथील क्रांती चौक ते गल्ली क्रमांक ६ येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जेसीबी’च्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. अशाच प्रकारे शाहूवाडीत मिरवणूक काढून रणवीर गायकवाड यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकीकडे राज्यशासन वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री अन् लोकप्रतिनिधीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पायमल्ली करत आहेत. अशा उदहारणांवरून राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या जिवाची किती पर्वा आहे ? हेच सिद्ध होते.