पनवेल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी विरूपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप !

भाजपच्या वतीने पंजाबमधील काँग्रेस सरकारचा निषेध !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी विरूपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप करतांना भाजपचे कार्यकर्ते

पनवेल, ११ जानेवारी (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेविषयी पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई आणि निष्काळजीपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना साहाय्य केले. त्यामुळे भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १० जानेवारी या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही घटना आणि पंजाब काँग्रेस सरकार यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी येथील विरूपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप करण्यात आला.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘वुई सपोर्ट पी.एम्. मोदी’ या मोहिमेत कार्यकर्ते आणि नागरिक यांनी ‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत’ अशी घोषणा देऊन स्वाक्षरी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर पत्रकारांना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी पंजाबमध्ये जातात. तो कार्यक्रम पक्षाचा किंवा राजकीय नव्हता. तो शासकीय कार्यक्रम होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांचे त्या ठिकाणी भूमीपूजन होणार होते. अशा वेळी पंतप्रधानांची वाट अडवली जाणे, त्याचा मार्ग ठरलेला असतांना ऐनवेळी हेलिकॉप्टर जरी रहित झाले, तरी त्या वेळी ज्या ठिकाणाहून मार्गक्रमण करणार त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जाते. बंदोबस्त असतांना निदर्शने करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाट अडवली. अशा वेळी निदर्शनकर्त्यांना कह्यात घेणे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक होते; मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी जाणूनबुजून नियम पाळला नाही. संविधानिक पदावर असूनही मुख्यमंत्र्यांनी असे वागणे योग्य नाही. त्यामुळे या घटनेचा निषेध करू तेवढा अल्प आहे.