नागपूर ग्रामीण भागात शाळांतील ५५१ शिक्षकांची पदे रिक्त !

जिल्हा परिषदेतील शाळांतील पटसंख्या घटत आहे !

नागपूर – जिह्यातील ग्रामीण भागांतील शाळांमधील ५५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. नरखेड आणि पारशिवनी तालुक्यांतील ४ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नाही. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाकडून शेजारील केंद्रातील शाळेतील शिक्षकांना प्रतिदिन पाठवण्यात येत आहे. अशा पद्धतीने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कारभार चालू आहे, तसेच दिवसेंदिवस या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय अशी होत आहे. गुणवत्तेसमवेत शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्याही घटत चालली आहे.

जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या अनुमाने १ सहस्र ५३० शाळा आहेत. त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जवळपास ७१ सहस्र ५०५ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे एकूण ४ सहस्र ५५२ शिक्षकांची पदे संमत आहेत; मात्र सध्या या ठिकाणी ४ सहस्र १ शिक्षकच कार्यरत आहेत. ५५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकसंख्या अल्प असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात. याविषयी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे म्हणाले की, भावी काळात शाळांच्या पटसंख्येवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने सर्व साहाय्यक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तसेच विषय पदवीधर शिक्षक आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

विनामूल्य गणवेश, पाठ्यपुस्तके आणि भोजन देऊनही विद्यार्थी पटसंख्या अल्प !

गेल्या काही वर्षांमध्ये गुणवत्तेअभावी आणि ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या प्रतिवर्षी घसरत आहे. ही पटसंख्या रोखण्यासाठी शासनाने यापूर्वी सर्व शिक्षा आणि आता समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश, पाठ्यपुस्तके आणि मध्यान्ह भोजन अशा विविध योजनांचा लाभ देणे चालू केले; परंतु शाळांमध्ये आवश्यक तितके आणि अपेक्षित असे शिक्षक नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे पाल्यांना इंग्रजी किंवा इतर खासगी शाळांमध्ये शिकवण्याकडे ग्रामीण पालकांचाही कल वाढत आहे. ही पटसंख्या रोखण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाकडून कुठलीही उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही.