कोल्हापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकाच वेळी १० ठिकाणी संचलने !

गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोरोना संसर्ग जनजागृती

शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन करतांना स्वयंसेवक

कोल्हापूर, १० जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा ४२ शाखा चालू आहेत. या शाखांच्या वतीने कोरोना संसर्गाच्या नियमावलीचे पालन करत गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि कोरोना संसर्ग जनजागृतीसाठी शहरात १० ठिकाणी संचलने करण्यात आली. संघाच्या गणवेशात अनेक स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. जरगनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, सानेगुरुजी वसाहत, राजारामपूरी, रुईकर कॉलनी, कदमवाडी, कसबा बावडा, हरी ओमनगर या स्थानी ही संचलने झाली.

या वेळी ‘लस घेऊया’, ‘मास्क वापरूया’, ‘कोरोनावर मात करूया’, असे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली ही सर्व संचलने पार पडली. ‘सर्व नागरिकांनी लस घ्यावी, मास्क आणि कोरोना नियम काटेकोर पाळावेत’, असे आवाहन संघचालक प्रमोद ढोले यांनी केले. ठिकठिकाणी नागरिकांनी रांगोळी आणि पुष्पवृष्टी करून भगव्या ध्वजाचे स्वागत केले.