नागपूर पोलिसांनी श्रीनगरला जाऊन आतंकवादी तरुणाची चौकशी केली !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी केल्याचे प्रकरण

नागपूर – येथील संघ मुख्यालय हे आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महमंद’च्या  निशाण्यावर असल्याचे उघड झाले होते. २६ वर्षीय महाविद्यालयीन तरुण हा शहरातील संवेदनशील भागांची रेकी करून परत गेला. यात त्याने काही छायाचित्रे आणि व्हिडिओ जैश-ए-महमंद या संघटनेला पाठवले आहेत; पण त्याने नेमक्या कुठल्या भागांची रेकी केली, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी नागपूर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे डिसेंबर २०२१ च्या शेवटी श्रीनगर येथे जाऊन आले आहेत. त्यानंतरच यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंद करून संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

१. तरुण २ दिवस सीताबर्डी परिसरात एका लॉजवर थांबला होता. त्या वेळी त्याने नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या भागात रेकी केली; पण त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा बंदोबस्तामुळे पाहिजे ती माहिती तो गोळा करू शकला नाही.

२. रेशीमबाग भागातील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात मात्र या तरुणाने रेकी करून काही छायाचित्रे काढली आहेत. नागपूर येथे मुक्कामी असतांना त्याला साहाय्य कुणी केले ? याचे अन्वेषण येथील गुन्हे शाखेकडून चालू आहे.

३. श्रीनगर येथील पाममपोर पोलिसांनी त्या आतंकवाद्याला अटक केली होती, त्या वेळी त्याच्याकडून हँडग्रेनेड आणि अन्य साहित्य जप्त केले होते.

४. संघ मुख्यालय आणि देहली पोलीस मुख्यालय यांसह आणखी काही संवेदनशील ठिकाणी तरुणाने रेकी केल्याची माहिती अन्वेषण यंत्रणेच्या हाती लागली आहे.

५. या तरुणाला देशभरातील ४-५ संवेदनशील भागांची रेकी करून माहिती गोळा करण्याचे दायित्व जैश-ए-महमंद या आतंकवादी संघटनेकडून देण्यात आले होते.