गोव्यात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधी पक्ष कृतीशील

‘गोवा फॉरवर्ड’चे नेते तथा आमदार विजय सरदेसाई

पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – भाजपच्या विरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचे आवाहन ‘गोवा फॉरवर्ड’चे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या प्रस्तावाला आधी तृणमूल काँग्रेसने आणि आता काँग्रेस पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. मगोपचे श्री. सुदिन ढवळीकरही याविषयी सकारात्मक आहेत.

गोव्यात भाजपच्या विरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची महाविकास आघाडी

महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात महाविकास आघाडी सिद्ध करून भाजपला हरवण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘आयपॅक’चे नेते प्रशांत किशोर यांच्याशी २ दिवसांपूर्वी चर्चा केली. या घटनेनंतर तृणमूलच्या खासदार मोहुआ मोहित्रा ७ जानेवारी या दिवशी ट्वीट करून म्हणाल्या, ‘‘भाजपला हरवण्यासाठी आम्ही ४ पावले पुढे जाऊन वाटेल तो त्याग करण्यासाठी सिद्ध आहेत.’’

काँग्रेसचे नेते तथा पक्षाचे गोवा प्रभारी पी. चिदंबरम् ८ जानेवारी या दिवशी म्हणाले, ‘‘गोव्यात भाजपला हरवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.’’ यापूर्वी तृणमूल काँग्रेसने ‘मगोप’ समवेत, तर काँग्रेस पक्षाने ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षासमवेत युती केलेली आहे. प्राप्त माहितीनुसार प्रस्तावित महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप हे ४ पक्ष असू शकतात. या अनुषंगाने काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आहे; मात्र या दोन्ही पक्षांनी याविषयी गुप्तता पाळली आहे. ही महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यासाठी चारही पक्षांना जागावाटप करतांना फार मोठी तडजोड करावी लागणार आहे. महाविकास आघाडीविषयी बोलतांना ‘मगोप’चे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाचे स्वागत आहे. १० जानेवारीपर्यंत याविषयी निर्णय होणार आहे.’’