समाजातील संतांकडे उपायांसाठी जातांना त्यांना आध्यात्मिक त्रास नसल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे, या विषयी घडलेला एक प्रसंग

श्री. राम होनप

‘गेल्या वर्षी माझ्या वडिलांची प्रकृती ठिक नव्हती, तेव्हा मला एका व्यक्तीने सांगितले, ‘‘एका जिल्ह्यात एक संत आहेत ते सूक्ष्मातून व्यक्तीच्या रोगाचे निदान करतात आणि त्यानुरूप त्याला औषधे देतात. त्यामुळे व्यक्तीचा रोग लवकर बरा होतो.’’ हे ऐकून मी त्या संतांना संपर्क केला. त्या संतांनी वडिलांना प्रत्यक्ष न पहाता सूक्ष्मातून त्यांच्या रोगाचे अचूक निदान केले आणि औषध दिले.

हे औषध चालू करून १ मास झाल्यावर एक साधक सहज बोलतांना मला म्हणाला, ‘‘औषधे देणार्‍या संतांना पूर्वी आध्यात्मिक त्रास असल्याचे समजले होते.’’ हे ऐकून ‘आता काय करायचे ?’ असा मला प्रश्न पडला. त्या वेळी ‘संतांनी दिलेल्या औषधांची ‘यू.ए.एस्.’(युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) उपकरणाद्वारे चाचणी करू शकतो’, असा विचार माझ्या मनात आला. या चाचणीमुळे व्यक्ती आणि वस्तू यांच्याभोवतीची सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभावळ समजते.

संतांनी दिलेल्या औषधांची आश्रमात ‘यू.ए.एस्.’ चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी दिलेल्या बहुतेक औषधांची सकारात्मक प्रभावळ १ मीटर, तर नकारात्मक प्रभावळ १२ मीटर इतकी होती, तसेच काही औषधांत केवळ नकारात्मक प्रभावळ होती.

या प्रसंगी माझ्या मनात विचार आले, ‘कलियुगात आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असून त्याचा प्रभाव संतांवर पडलेला आहे. त्यामुळे कुठल्याही संतांचे उपाय चालू करण्यापूर्वी त्यांना आध्यात्मिक त्रास नसल्याची निश्चिती करून मगच ते चालू करायला हवेत. तसे न केल्यास मोठी हानी होऊ शकते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक