|
मिरज, ८ जानेवारी (वार्ता.) – केशरचनाकार जावेद हबीब यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केशरचनेचे प्रात्यक्षिक दाखवतांना एका महिलेच्या डोक्यावर थुंकून तिचा अवमान केला. हा प्रकार अतिशय निंदनीय असून तो या महिलेचाच नव्हे, तर संपूर्ण स्त्रीवर्गाचा मोठा अपमान आहे. त्यामुळे हबीब यांना त्वरित अटक करावी, अशा मागणीचे निवेदन ७ जानेवारी या दिवशी भाजपच्या सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी प्रांताधिकारी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता सीता, द्रौपदी, संत मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई, जनाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती, भगिनी निवेदिता आदी थोर महिलांना पूजनीय आणि वंदनीय म्हटले आहे. हिंदु संस्कृतीमध्ये स्त्रियांना मातेसमान मानले आहे. असे असतांना जावेद हबीब यांनी केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असल्याने त्यांना त्वरित अटक करावी.