रामनाथी आश्रमात झालेल्या ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळ्याच्या प्रसंगी सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना आलेली अनुभूती !

१८.२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळा झाला. सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि त्यांचा मुलगा श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना त्या प्रसंगी सारखीच अनुभूती आली. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. योगिता प्रसाद चेऊलकर
श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व जाणवणे

‘आज मला दिवसभर शांत आणि सकारात्मक वाटत होते. ‘आजचा दिवस पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांवर अद्वितीय कृपेचा वर्षाव करणार आहेत’, असे मला सातत्याने वाटत होते. मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रकर्षाने जाणवत होते. विधी पूर्ण झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले कमळांच्या पुष्पांकडे पहात होते. त्या वेळी ‘प्रत्येक कमलपुष्पाला त्यांचे कृपाशीर्वाद मिळाले असून ती आनंदी झाली आहेत’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरुदेवांच्या दिशेने ती पुष्पे झुकत होती अणि ती खरोखरच हसत आहेत’, असे मला जाणवले.

२. सद्गुरु सिरियाक वाले यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा तोंडवळा दिसणे

आम्ही हा कार्यक्रम ‘प्रोजेक्टर’वर पहात होतो. त्या वेळी मला ‘सद्गुरु सिरियाक वाले मध्यभागी बसले असून त्यांच्या उजव्या बाजूला श्रीसत्‌शक्‍ति बिंदाताई अन् डाव्या बाजूला श्रीचित्‌शक्‍ति गाडगीळकाकू बसल्या आहेत’, असे दृश्य दिसले. त्या वेळी मला जे दृश्य दिसत होते, ते माझ्या आकलन क्षमतेच्या बाहेर होते. मला सद्गुरु सिरियाकदादांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा तोंडवळा दिसत होता. सद्गुरु सिरियाकदादांनी निळ्या रंगाचा झब्बा परिधान केला होता. ‘त्यांच्या ठिकाणी श्रीविष्णु आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूंना श्रीदेवी अन् भूदेवी आहेत’, असे मला वाटत होते. हे दृश्य दिसल्याने माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

३. परात्पर गुरुदेव नेहमी म्हणतात, ‘‘सद्गुरु सिरियाकदादा, श्रीसत्‌शक्‍ति बिंदाताई, श्रीचित्‌शक्‍ति गाडगीळकाकू आणि मी एकच आहोत. आमच्यात अद्वैत आहे.’’ त्यांचे हे मौल्यवान वाक्य मला त्या वेळी आठवले.

मी ही अनुभूती माझ्या मुलाला (समृद्धला) सांगितली. त्यालाही हा सोहळा पहातांना वरीलप्रमाणेच अनुभूती आली.

परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा उत्तरोत्तर वृद्धिंगत करणारी ही अमूल्य अनुभूती ईश्वराने आम्हाला दिली. त्यासाठी आम्ही त्याच्या चरणांशी कृतज्ञ आहोत.’

– सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक