नवी मुंबई – कोपरखैरणे येथील भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांनी फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली होती. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आक्षेपार्ह पोस्टविषयी शिवसैनिकांनी तक्रार केली होती. त्याआधारे ६ जानेवारीला रात्री गुन्हा नोंद करून रात्री उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. याविषयी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले की, अशा प्रकारे संदीप म्हात्रे यांनी पोस्ट करणे चुकीचे असल्याचे आम्ही मान्य करतो; पण त्यासाठी त्यांना अटक करणे हा पर्याय नव्हता, त्यांना समज द्यायला पाहिजे होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य पक्षांच्या नेत्यांवरही आक्षेपार्ह पोस्ट येत असतात; मात्र वरील प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून म्हात्रे यांना अटक करायला लावणे अयोग्य आहे. हे राजकारण चालवले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह पोस्ट येत असतात, आम्हीही यापुढे त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करू, अशी चेतावणी घरत यांनी दिली आहे.