कोल्हापूर – कृषी पंपांच्या वीज वापराच्या नावाखाली १२ सहस्र कोटींची चोरी आणि भ्रष्टाचार होत आहे. शेतकर्यांची नाहक अपकीर्ती केली जात आहे, असा आरोप वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. या पत्रकात त्यांनी पुढील सूत्रे मांडली आहेत.
१. कृषीपंप वीज विक्री हे ‘वितरण गळती’, चोरी आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठिकाण आहे. कृषी पंपांसाठी होणारा विजेचा वापर ३१ टक्के आणि वितरण गळती १५ टक्के आहे, असा दावा वीज आस्थापनाने केला आहे. (सरकारचे एकतरी क्षेत्र भ्रष्टाचारशून्य आहे का ? – संपादक) प्रत्यक्षात कृषी पंपांसाठी विजेचा वापर केवळ १५ टक्के आहे आणि वितरण गळती किमान ३० टक्क्यांहून अधिक आहे. याविषयी संबंधितांना माहिती आहे.
२. राज्यातील सर्व विनामीटर कृषी पंपांची अश्वशक्ती वर्ष २०११-१२ पासून वाढवली होती. त्यामुळे देयक ३ ऐवजी ५, ५ ऐवजी ७.५ आणि ७.५ ऐवजी १० अश्वशक्ती याप्रमाणे चालू आहे. मीटर असलेल्या पंपापैकी ८० टक्के पंपांचे मीटर्स बंद आहेत.
३. राज्यातील केवळ १.४ टक्के पंपांचे मीटर रीडिंगप्रमाणे देयक होत आहे. उर्वरीत सर्व ९८.६ टक्के पंपांचे देयक गेल्या १० वर्षांपासून प्रतिमहा सरासरी प्रतिअश्वशक्ती १०० ते १२५ युनिट्सप्रमाणे होत आहे. देयक किमान दुप्पट वा अधिक आहे. त्यामुळे देयक, वीजवापर आणि थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दुप्पट देयकांवर तितकाच दंड आणि व्याज लागल्याने एकूण थकबाकी कागदोपत्री चौपट झालेली आहे.