राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी प्रतिदिन एक घंटा वेळ देऊन कृतीच्या स्तरावर सिद्ध  व्हा ! – कु. प्राची शिंत्रे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

मुंबई – हिंदूंना देवता, राजे, वीर योद्धे यांनी शौर्याचा इतिहास दिला आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःतील हिंदुत्व जागृत राखणे, हिंदुत्व जोपासणे हेच हिंदूंसाठी ‘शौर्य जागरण’ आहे. ‘३१ डिसेंबर साजरा करणे’ ही एक वैचारिक विकृती असून त्याला आपण विरोध केलाच पाहिजे. पाश्चात्त्य संस्कृती आजच्या युवा पिढीला चंगळवादी अन् भोगवादी समाजाचे सदस्य बनवत आहे. अन्य धर्मांतील उत्सव साजरे करणे म्हणजे, ‘हे त्या दिवसापुरते धर्मांतरच आहे.’ त्यामुळे ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याचे टाळून आपण एका दिवसाचे धर्मांतर टाळणे, हे धर्मरक्षणच आहे. अशा कृतीच्या स्तरावर राष्ट्र-धर्म यांसाठी युवकांनी सिद्ध झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या युवा संघटक कु. प्राची शिंत्रे यांनी केले. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवकांसाठी गेल्या आठवड्यात आयोजित ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात त्या बोलत होत्या.

कु. प्राची शिंत्रे

पाश्चात्यांचे सण हे क्षणिक सुख देणारे असून ते आपल्याला भोगवादी बनवतात. याउलट हिंदूंचे सण हे शाश्वत आंनद देणारे असून ते आपल्याला त्यागातून आनंद अनुभवायला शिकवतात. म्हणून धर्माचे आचरण आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ला आपल्याला लढण्याची प्रेरणा देतो, शौर्याची प्रेरणा देतो. हा इतिहासाचा ठेवा जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या गडसंवर्धन मोहिमेत सहभागी होऊन प्रतिदिन एक घंटा वेळ देऊन कृतीच्या स्तरावर राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध होण्याचे आवाहन या वेळी कु. प्राची शिंत्रे यांनी उपस्थित धर्मप्रेमींना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ओंकार नातू यांनी केले. आरंभी कु. श्रुती किचंबरे यांनी शौर्यजागृती व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्याची इच्छा उपस्थितांनी प्रदर्शित केली.

उपस्थितांचे मनोगत !

  • आजच्या शिक्षणपद्धतीत पालट घडायला हवा. मुलींमध्ये जागृती व्हायला हवी. स्वतःचे रक्षण स्वतःलाच करता आले पाहिजे. अन्य कोणी रक्षणाला नाही येणार. त्यासाठी प्रशिक्षणवर्ग उपयुक्त आहे. – सौ. अश्विनी राऊत, गृहिणी
  • हिंदूंमध्ये संघटितपणा नाही आणि स्वतःच्या धर्माविषयी ज्ञान पण नाही. त्यामुळे कोणी आपल्या धर्माविषयी प्रश्न उपस्थित केले, तर आपल्याला त्याचे उत्तर देता येत नाही. अनेक चित्रपटांमधून आपल्या प्रथा-परंपरांविषयी शंका उपस्थित केली जाते. आपण जागृत झालो, तर धर्मद्रोह्यांना उत्तर देऊ शकतो. – श्री. जतेश्वर उपर, धर्मप्रेमी