नाथपंथानुसार साधना करणाऱ्या पू. यशवंत शिवनगिरीकर महाराजांची सनातनच्या रामनाथी, गोवा आश्रमाला सदिच्छा भेट !

नाथपंथानुसार कठोर साधना करणारे वडोद (संभाजीनगर) येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज

रामनाथी (गोवा) – वडोद (संभाजीनगर) येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी २ जानेवारी २०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर, त्यांचे संभाजीनगर येथील शिष्य श्री. शिवम् वर्मा आणि त्यांची पत्नी सौ. राजश्री शिवम् वर्मा हेही उपस्थित होते. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांना आश्रम दाखवला.

सनातन आश्रम पहातांना पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांना आलेल्या अनुभूती

१. पू. शिवनगिरीकर महाराज आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्वांनाच आश्रम दाखवतांना ‘सनातन प्रभात’चे कार्यालय, सूक्ष्म-जगताविषयी माहिती देणारा प्रदर्शनकक्ष, पू. महाराज वास्तव्यास असलेली खोली यांठिकाणी आणि आश्रम पाहून पूर्ण झाल्यावर, अशी एकूण ४ वेळा पू. शिवनगिरीकर महाराज यांना सुगंधाची अनुभूती आली.

२. आश्रमाच्या मार्गिकेतील लादीवर उमटलेला ‘ॐ’ पहातांना, तसेच ध्यानमंदिरात दर्शन घेतांना आणि स्वागतकक्षात असलेले सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे सजीव झालेले चित्र पहातांना पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे काही क्षण ध्यान लागले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. अन्नपूर्णाकक्ष आणि भोजनकक्ष येथील व्यवस्था पाहून पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी ‘व्यवस्था उत्तम आहे’, असे सांगितले.
२. धान्य कक्षात पू. शिवनगिरीकर महाराज यांना श्री अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवले आणि त्यांनी तेथे उत्स्फूर्तपणे श्री अन्नपूर्णादेवीचा श्लोक म्हटला.
३. श्री भवानीदेवीची मूर्ती आणि तिचे मंदिर पाहून झाल्यावर त्यांनी ‘अशी मूर्ती मी कुठेच पाहिली नाही’, असे पू. महाराजांनी सांगितले.
४. सूक्ष्म-जगताची माहिती देणारे प्रदर्शन पाहिल्यावर ‘असे प्रदर्शन कुठेच नाही आणि हे कार्य सर्वांसमोर यायला हवे’, असे पू. महाराजांनी सांगितले.
५. ‘खरे हिंदुत्व पहाण्यासाठी सर्वांनी आश्रमात यायला हवे’, असेही पू. महाराज म्हणाले.
६. ध्यानमंदिराच्या शेजारी आपोआप उगवलेली औदुंबराची झाडे पाहून पू. महाराजांनी सांगितले की, हे सत्य आहे आणि मी स्वतः ३-४ वेळा अनुभवले आहे.
७. पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर यांनी सांगितले की, आश्रमातील साधकांमध्ये अहंभाव, पद, प्रतिष्ठा, उच्चशिक्षितपणा यांचा आविर्भाव असे काहीच जाणवत नाही. येथे साधकांमध्ये ‘मी’पणा जाणवत नाही.

आश्रमातील सर्व साधकांचा निःस्वार्थ सेवाभाव आणि झोकून देऊन सेवा करण्याची वृत्ती पू. शिवनगिरीकर महाराज यांना पुष्कळ आवडली. आश्रम पहातांना पू. महाराज स्वतःहून सर्व साधकांना विनम्रतेने नमस्कार करत होते.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक