गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच सनातनच्या ६२ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७२ वर्षे) !
पौष शुक्ल पक्ष द्वितीया (४.१.२०२२) या दिवशी पू. (श्रीमती) सुमनमावशी यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त हा लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘मी लहानपणापासून कर्मकांडातील विधी भावपूर्ण करत असे आणि माझ्या जीवनात येणार्या सर्व अडचणी देवाला सांगत असे. प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाल्यावर मी ‘आता सनातन सोडून कुठेही जायचे नाही’, असा निश्चय केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्या श्रद्धेच्या बळावर मी प्रचारसेवा आणि अन्य विविध सेवा केल्या. १९.७.२०१६ या दिवशी गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान केले आणि माझ्याकडून साधना करवून घेतली. मी लहानपणापासून केलेल्या साधनेविषयीची सूत्रे या लेखात लिहिली आहेत.
१. बालपण
१ अ. लहानपणी मामांच्या घरी रहाणे आणि तेथे चांगले संस्कार होणे : ‘मी मामांकडे लहानाची मोठी झाले. मामांच्या घरचे वातावरण सात्त्विक होते. मामांच्या घरची मंडळी उंडीर, बांदोडा (गोवा) येथील सिद्धारूढ महाराज यांची भक्त होती. माझी आजी (आईची आई) संध्याकाळी आमच्याकडून प्रार्थना आणि श्लोक म्हणवून घ्यायची. मामांच्या कुटुंबियांमुळे माझ्यावर धार्मिकतेचे संस्कार झाले. माझे बालपण मामांकडे पुष्कळ लाडात गेले.
१ आ. मला देवाचे महत्त्व समजल्यानंतर मला जे हवे असायचे, ते मी देवाला सांगायचे आणि देव मला ते वेगवेगळ्या माध्यमांतून पुरवायचा.
२. विवाहानंतर
२ अ. सासरी पुष्कळ त्रास होणे आणि जीव देण्यासाठी गेल्यावर ‘स्थानिक देवाने घराशेजारी रहाणार्या व्यक्तीच्या रूपात येऊन वाचवले’, असे जाणवणे : मी लग्न होऊन सासरी गेल्यावर मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. या त्रासाला कंटाळून मी एक दिवस मध्यरात्री घरातील सर्व जण झोपले असतांना खोल पाणी असलेल्या वहाळाकडे जीव द्यायला गेले. मी पाण्यात उतरल्यावर आमच्या शेजारी रहाणारी एक व्यक्ती तेथे आली. तिने ओळखल्याने मला पाण्यातून ओढून बाहेर काढले आणि घरी पाठवले. त्या वेळी ‘मला तेथील स्थानिक देवाने वाचवले’, असा भाव माझ्यात निर्माण झाला आणि माझी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. व्यवहारातील कामे होण्यासाठी इतरांनी सांगितलेले कर्मकांडातील पूजाविधी करणे : समाजातील व्यक्ती मला जे कर्मकांडातील विधी किंवा पूजा करायला सांगायचे, ते मी करायचे. मला त्या प्रत्येक कृतीतून चांगले वाटत होते. मला ते विधी करण्याचा कधीच कंटाळा आला नाही. मुलाने (श्री. संदेश नाईक यांनी) चांगले शिक्षण घ्यावे, चांगले घर मिळावे, यासारखी व्यवहारातील कामे होण्यासाठी मी पूजाविधी करत होते.
२ आ १. सोळा शुक्रवारचे व्रत करतांना देवीने वेगवेगळ्या अनुभूती देणे : एकदा मी देवीचे सोळा शुक्रवारचे व्रत करण्याचे ठरवले. ते व्रत करतांना मी सगळे नियम पाळून दिवसभर काहीही न खाता केवळ रात्री जेवत असे. मी देवीची पूजा करत असतांना ‘देवी हलल्यासारखी दिसणे, देवीच्या मागे पुष्कळ प्रकाश दिसणे, कधी देवी हसत असल्याचे किंवा कधी तिच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचे’, मला दिसायचे.
२ आ २. भाड्याच्या घरात रहात असतांना भूमीपूजन विधी केल्यावर भाड्याने रहात असलेले घर विकत घेण्याची संधी मिळणे : चांगले घर मिळावे; म्हणून मी प्रत्येक बुधवारी भूमीपूजन विधी (भूमीवर देवीचे चित्र काढून तिचे पूजन करणे) कर्मकांडातील सर्व नियम पाळून करत होते. असे ९ आठवडे पूर्ण झाल्यावर आम्ही ज्या घरात भाड्याने रहात होतो, त्या घराचा मालक आमच्याकडे आला आणि आम्हाला ‘हे घर विकत घेऊ शकता का ?’, असे विचारू लागला. त्या वेळी ‘विधींना किती महत्त्व आहे !’, हे माझ्या लक्षात आले.
२ आ ३. कर्मकांड केल्यामुळे अन्नपूर्णादेवी प्रसन्न होणे : मी सर्व कृती कर्मकांडानुसार केल्यामुळे ‘माझ्यावर अन्नपूर्णादेवी प्रसन्न झाली आहे’, असे मला वाटत होते. मला घरात कधीच कशाची न्यूनता भासली नाही. मला जे आवश्यक होते, ते त्या त्या वेळी मिळत गेले.
२ इ. देवावर दृढ विश्वास बसणे आणि अडचणी आल्यावर देवाला प्रार्थना करणे: माझा देवावर दृढ विश्वास होता. त्यामुळे मी प्रत्येक कृती देवाला विचारून करत होते. काही अडचण आल्यास मी देवाला प्रार्थना करत असे, उदा. मुले किंवा यजमान बाहेर गेले आहेत आणि वेळेवर आले नाहीत, तर मी ‘देवा, तूच त्यांचे रक्षण कर आणि त्यांना सुरक्षित घरी आण’, अशी प्रार्थना माझ्याकडून होत असे.
२ ई. कर्मकांड करतांना चांगले वाटणे; परंतु त्यातून पूर्ण समाधान न मिळणे: कर्मकांड करतांना मला चांगले वाटत होते, तरीही मला समाधान लाभत नव्हते. ‘मी कुठेतरी अल्प पडत आहे’, असे मला वाटत होते. त्यासाठी ‘मी आणखी काय प्रयत्न करू ?’, असा विचार माझ्या मनात येत होता.
– (पू.) श्रीमती सुमन नाईक, कपिलेश्वरी, फोंडा, गोवा. (२९.८.२०२१) (क्रमशः उद्याच्या अंकात)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |