अधिवक्ते ७५ व्या वर्षीही खटला लढवू शकतात, तर न्यायाधिशांना ६५ व्या वर्षी निवृत्ती का ? – अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल

अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल

नवी देहली – आमच्या न्यायमूर्तींकडे पाहून मी निश्‍चितपणे सांगू शकतो की, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची कर्तव्ये न्याय्यपणे, निष्पक्षपणे आणि सक्षमतेने पार पाडतील. ७० ते ७५ वर्षांच्या अधिवक्त्यांना युक्तीवाद करतांना कोणतीही अडचण येत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ७० व्या वर्षी आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ६५ व्या वर्षी निवृत्त होतात. असे का ? एव्हाना न्यायाधीश त्यांचा सर्व अनुभव आणि कौशल्य यांनी न्यायिक व्यवस्थेत चांगले योगदान देण्यास सक्षम असतात. उच्च न्यायव्यवस्था आणि भारत सरकार यांनी एकत्र येत एक नवीन आदर्श निर्माण करण्यासाठी चांगली योजना आणण्याची वेळ आली आहे, असे विधान भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी केले. न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित ऑनलाईन निरोप समारंभाला संबोधित करतांना ते बोलत होते.