राज्यात कुणालाही वैयक्तिक सुरक्षा पुरवावी लागू नये, अशी स्थिती निर्माण करणार !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा विश्‍वास !

अशा प्रकारचा विश्‍वास सध्याच्या काळात बाळगणार्‍या सरमा यांना शुभेच्छा; मात्र केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात गेल्या ७४ वर्षांत अशी स्थिती निर्माण होऊ शकली नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक

दिब्रुगड (आसाम) – संपूर्ण जग पालटले आहे. आता अतिमहनीय व्यक्तींना (‘व्हीआयपीं’ना) सुरक्षा आवडत नाही. मी सुरक्षिततेविना जिल्ह्यातील एखाद्या ठिकाणी भेट देऊ शकलो आणि लोकांशी संवाद साधू शकलो किंवा फिरू शकलो, तर मला चांगले वाटेल; पण जर मला कमांडोंनी घेरले असेल, तर माझ्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली नाही, याची आठवण मला होत राहील. पुढील २-३ वर्षांत राज्यात मला अशी परिस्थिती आणायची आहे की, आसाममध्ये कुणालाही सुरक्षा नको असेल, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी येथे केले. दिब्रुगड जिल्ह्यातील दुलियाजन येथील ‘ऑईल इंडिया’च्या मुख्यालयात आयोजित सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या दुसर्‍या परिषदेचे उद्घाटन करतांना मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी हे विधान केले. मुख्यमंत्री सरमा यांची ही परिषद तब्बल १८ घंटे चालली आणि पहाटे ४ वाजता संपली.

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नीट असेल, तर लोकांना वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पी.एस्.ओ. – पूलिस स्टँडिंग ऑफिसर) नियुक्त करण्याची आवश्यकता काय आहे ? एखाद्या व्यक्तीला पी.एस्.ओ. देणे म्हणजे पोलिसांचे अपयश आहे. व्हीआयपी किंवा कुणालाही धोका निर्माण करणारा कोणताही गुन्हेगार, बंडखोर तुमच्या जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाही, याची निश्‍चिती करा, पी.एस्.ओ. देऊ नका, असा आदेश सरमा यांनी पोलिसांना दिला.