राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी आमचा वापर केला ! – चंद्रदीप नरके, शिवसेना

काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रद्रीप नरके (चित्र सौजन्य – SakalMedia)

कोल्हापूर, ३ जानेवारी (वार्ता.) – काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ हे निवडणुकीत शिवसेनेला सामावून घेतील अशी अपेक्षा होती. गोकुळ, जिल्हा परिषद, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ अशा निवडणुकीत आम्ही एकत्र आलो; पण या दोन्ही नेत्यांकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचा केवळ वापर केला, अशी टिका शिवसेनेचे माजी आमदार चंद्रद्रीप नरके यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रदीप नरके पुढे म्हणाले, ‘‘आमदार पी.एन्. पाटील हे आमचे विरोधक आहेत. आम्ही विधानसभा त्यांच्याविरुद्ध लढलो; मात्र जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा मुलगा राहुल पाटील यांना अध्यक्ष केले. तालुक्यात एकमेकांच्या विरोधातील राजकारण असूनही महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या. असे असतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला का साहाय्य करत नाही ?’’ या प्रसंगी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेत राजकारण आणले नाही, असे खोटे सांगून आघाडीच्या नेत्यांनी निरनिराळी विधाने करणे आता बंद करावीत.’’