नगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीचा अहवाल सरकारकडे जमा होऊनही त्यावर कारवाई नाही !

आगीसारख्या प्रकरणांच्या अहवालावर तत्परतेने कारवाई न होणे, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने ही समस्या त्वरित सोडवणे अपेक्षित आहे. – संपादक 

नगर – जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतीदक्षता विभागात लागलेल्या आगीचा चौकशी अहवाल नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समितीने चौकशी करून नोव्हेंबरमध्येच सरकारला सादर केला आहे; मात्र त्यानंतर सरकारकडून त्यावर काहीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. १४ जणांचा बळी घेणार्‍या आगीचे दायित्व कुणाचे ? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. ६ नोव्हेंबर या दिवशी लागलेल्या आगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह ६ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातील ४ जणांवर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद करून अटक केली आहे, तर दोघांना जामीन मिळाला आहे.