गुरुजी तुम्हीसुद्धा… !

तुकाराम सुपे (डावीकडे)
श्री. नीलेश पाटील

‘आरोग्यसेवा, म्हाडा भरती घोटाळ्याच्या पाठोपाठ आता ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. हा घोटाळा ५ कोटी रुपयांचा असल्याचे प्राथमिक अनुमान आहे. १७ डिसेंबर २०२१ या दिवशी पुणे येथील ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’चे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरात ८८ लाख रुपयांची रोकड सापडली. ३० जून २०१६ या दिवशी राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून ‘राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्या’नुसार इयत्ता १ ली ते ८ वीच्या शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले, तसेच जे शिक्षक १३ डिसेंबर २०१३ पासून ३० जून २०१६ या कालावधीत सेवारत आहेत; मात्र टीईटी उत्तीर्ण नाहीत, त्यांना पहिल्या ३ संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. असे न झाल्यास संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येईल. शासनाने ३ ते ४ वेळा संधी देऊनही काही शिक्षक उत्तीर्ण होऊ न शकल्याने काहींनी लाख, २ लाख रुपये देऊन ‘टीईटी उत्तीर्ण’ असल्याचे बनावट (खोटे) प्रमाणपत्र प्राप्त केले.

जळगाव जिल्ह्यातील ७२ शिक्षकांनी वेळेत टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ३ कर्मचार्‍यांच्या ‘शालार्थ आयडी’ (या क्रमांकावरून कर्मचार्‍यास वेतन मिळते) आणि वैयक्तिक मान्यता या कागदपत्रांवर शिक्षण उपसंचालकांच्या बनावट स्वाक्षर्‍या असून ते सेवारत आहेत. स्वतः शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांच्या धारिका पडताळणीसाठी आले असता ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. जिल्ह्यातील अशा ३ कर्मचार्‍यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा नोंदवला आहे. असे पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र मिळवणार्‍या शिक्षकांकडून विद्यार्थी घडवण्याची काय अपेक्षा करणार ? अशा घटनांमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता लोप पावत चालली आहे, असे म्हटल्यास वावगे काय ? सरकारी नोकर भरती परीक्षांचा ठेका खासगी आस्थापनांना देण्यामागे सरकार-प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे ? हे स्पष्ट व्हायला हवे. बनावट स्वाक्षर्‍या आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवणार्‍या शिक्षकांवर काय कारवाई होईल ? हे काळच ठरवेल. हिंदु राष्ट्रात बनावट प्रमाणपत्रे मिळवून नोकरी करणारे नव्हे, तर राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून काम करणारे शिक्षक आणि ते नियुक्त करणारी यंत्रणा असेल. उपरोक्त दोन्ही घटना पहाता असे म्हणावेसे वाटते, गुरुजी तुम्हीसुद्धा !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव