विवाहासाठी पालकांच्या संमतीविना घर सोडणार्‍या मुलींची हत्या होते किंवा त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते ! – बिहारचे पोलीस महासंचालक एस्.के. सिंघल

पाटलीपुत्र (बिहार) – आज मुली विवाहासाठी पालकांच्या संमतीविना घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम दिसून येतात. यांतील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. या सर्वाची किंमत पालकांना मोजावी लागते, असे विधान बिहारचे पोलीस महासंचालक एस्.के. सिंघल यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘समाज सुधार अभियान’ राबवत आहेत. हे अभियान सध्या समस्तीपूर येथे चालू आहे. त्याच व्यासपिठावरून लोकांना संबोधित करतांना एस्.के. सिंघल यांनी हे वक्तव्य केले आहे.

पालकांनाही सल्ला देतांना सिंघल म्हणाले की, पालकांनी त्यांच्या मुला-मुलींशी समान संवाद साधला पाहिजे. त्यांनी मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकांनी मुलांच्या भावना समजून घेतल्या, तर ते त्यांच्याशी जोडलेले रहातात. असे केल्यास पालक चांगल्या समाजाच्या जडणघडणीत हातभार लावू शकतील.