गोव्यात कोरोनाबाधित २६१ नवीन रुग्ण

कोरोनाबाधित आढळण्याची टक्केवारी ७.२२ टक्के, तर एकूण रुग्णसंख्या ८५६

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, ३० डिसेंबर – गोव्यात ३० डिसेंबर या दिवशी कोरोनाविषयी ३ सहस्र ६१० चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २६१ नवीन रुग्ण आढळले. कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढून ते ७.२२ टक्के झाले आहे. राज्यात कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ८५६ वर पोचली आहे. कोरोनाविषयक चाचणीच्या दरावर नियंत्रण रहावे, यासाठी शासनाने चाचणीचा दर अधिकाधिक दीड सहस्र रुपये करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

पत्रादेवी तपासनाक्यावर सोयीअभावी प्रवाशांची गैरसोय

गोव्यात ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक परराज्यांतून येत आहेत; मात्र तपासनाक्यावर उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रावरील अपुरे मनुष्यबळ आणि वेळखाऊ यंत्रणा यांमुळे पर्यटकांना सुमारे २ – ३ घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह आणि इतर सुविधा नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. गोव्यात येण्यासाठी पेडणे तालुक्यात पत्रादेवी, किरणपाणी आणि न्हयबाग, अशी ३ तपासनाकी आहेत; मात्र यांपैकी पत्रादेवी नाक्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी आणि कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर इतर तपासनाक्यांवर अशी सुविधा नाही. पत्रादेवी तपासनाक्यावर गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. एका बसमध्ये एका प्रवाशाकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास त्याला कोरोनासंबंधी चाचणीसाठी रांगेत उभे रहावे लागते आणि त्याची चाचणी होईपर्यंत इतर प्रवाशांना ताटकळत रहावे लागते.